Dam  Pudhari
पुणे

Dam Water Release Protest: पिंपळगाव जोगे धरणातून विसर्ग सुरूच; जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १२०० क्युसेक विसर्गावर आक्षेप; तातडीने थांबवण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: मॉन्सूनने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट आहे. या स्थितीतही पिंपळगाव जोगे धरणातून पुष्पावती नदीपात्रात १२०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त करत हा विसर्ग बंद करण्याची मागणी केली. याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

पावसाला विलंब होत असल्याने आणि खरीप, रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरणातील पाणी जपून वापरण्याची गरज आहे. मात्र, या स्थितीकडे दुर्लक्ष करून धरणातून विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग म्हणजे पाण्याची उधळपट्टी असल्याची तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

याबाबत प्रगतशील शेतकरी जालिंदर उकिर्डे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेत निवेदन सादर केले आहे. यंदा जूनचा अर्धा महिना उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने आगामी काळात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी विनाकारण नदीपात्रात सोडणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे विरोधात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या पुष्पावती नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेलमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रत्यक्ष शेतीला किंवा ग्रामस्थांना कोणताही विशेष फायदा होत नाही. उलट हे पाणी पुढे वाहून जाऊन वाया जात असल्याने भविष्यातील गरजांसाठीचा महत्त्वाचा साठा कमी होत आहे.

पुष्पावती नदीकाठच्या अनेक गावांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची मागणी केली आहे. आज नदीत पाणी सोडून उद्या टँकर मागविण्याची वेळ येण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पाण्यासाठी आंदोलनाची तयारी

पर्यावरणीय आवश्यकता आणि तांत्रिक कारणांमुळे विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती पाहता या निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. प्रशासनाने हवामान विभागाचे अंदाज, धरणातील उपलब्ध साठा आणि भविष्यातील पाणी गरजांचा सखोल अभ्यास करून तातडीने विसर्ग थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT