पुणे : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या फेरीसाठी 26 डिसेंबरला प्रवेशाची अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना 27 ते 30 डिसेंबर यादरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तसेच, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष वर्ग 22 डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्याची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वेळापत्रकानुसार सीईटी सेलने राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 24 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहे. हा पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीची मुदत 30 डिसेंबरपर्यंत असेल. त्यानंतर 3 जानेवारी 2026 पासून तिसऱ्या फेरीची सुरुवात होणार आहे. त्या दिवशी दुसऱ्या फेरीत घेतलेला प्रवेश रद्द करण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. 4 ते 6 जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे सादर करण्याची सुविधा असेल. 7 जानेवारी रोजी गुणवत्ता यादी आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.
त्या वेळी विद्यार्थ्यांना 8 ते 10 जानेवारीदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहे. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 12 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना 12 ते 17 जानेवारीदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.