पुणे

शहरात पेव्हिंग ब्लॉक बसवताय ? जरा थांबा !

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात मोठे रस्ते व गल्ली बोळात कोठेही कशाही प्रकारे कोणत्याही रंगाचे पेव्हिंग ब्लॉक लावले जात आहेत. जुनी झाली की पुन्हा नवीन ब्लॉक बसविली जातात. त्यावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. या प्रकारच्या उधळपट्टीस आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आळा घातला आहे.

आवश्यक त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक न बसविता थेट काँक्रीटीकरण करावे. पुढील तीन वर्षांत केवळ नवीन मोठ्या व प्रमुख रस्त्यांच्या पदपथासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात यावेत, असे आदेश त्यांनी स्थापत्य विभागासह क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
दरवर्षी शहरभरात मोठ्या प्रमाणात पेव्हिंग ब्लॉकची कामे केली जातात. जुने ब्लॉक बदलून नवीन ब्लॉक बसविले जातात.

करड्या रंगाचे ब्लॉक बदलून रंगीत ब्लॉक बसविले जातात. अर्बन स्ट्रीट आणि स्मार्ट सिटी संकल्पनेनुसार जुने ब्लॉक बदलून शॉट ब्लास्टेड किंवा टेकटाईल पद्धतीचे ब्लॉक बसविले जात आहेत. ती कामे करताना मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे प्रमाण अत्यल्प करून त्याऐवजी काँक्रीटचा वापर करण्यावर भर देण्याचा निर्णय आयुक्त पाटील यांनी घेतला आहे.

त्यामुळे त्यावरील खर्च कमी होणार आहे. ब्लॉकचा खर्च तसेच, त्यावर होणारा देखभाल-दुरुस्तीचा वार्षिक खर्च या बाबी विचारात घेऊन नवीन पेव्हिंग ब्लॉकची कामे न करण्याचा निर्णय अभ्यासाअंती घेण्यात आला आहे. त्याऐवजी आवश्यकतेनुसार अंतर्गत छोटे रस्ते काँक्रिटीकरण करणे फायद्याचे ठरणार आहे.

यापुढील तीन वर्ष नव्याने विकसित करावयाच्या मोठ्या व मुख्य रस्त्यांच्या पदपथासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात यावेत, इतर भांडवली व महसुली कामांसाठी पेव्हिंग ब्लॉकचा अंतर्भूत करण्यात येऊ नये, त्यासाठी येणारा खर्च थांबविण्यात यावा आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात यावे, या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश स्थापत्य विभागासह क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

SCROLL FOR NEXT