पुणे

लोणावळा: वेहेरगाव-कार्ला रोडवरील वाहतूककोंडी सुटणार कधी? स्थानिक नागरिक हवालदिल

अमृता चौगुले

कार्ला (लोणावळा) : मौज-मस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कार्ला लेणी व एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच वाटर पार्क व लोहगड, विसापूर परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर कार्ला फाटा ते वेहेरगाव रोड तसेच मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.

उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

अजून पावसाळा सुरू झाला नाही. पावसाळ्यामध्ये ही वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे व स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

लोणावळा, खंडाळा, कार्ला, भाजे, लोहगड, विसापूर भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रमाणात पाऊस पडत असल्याने पर्यटनासाठी दर शनिवार, रविवार व सलग सुट्यांच्या दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असतात. यामुळे दरवर्षी निर्माण होणारी वाहतूककोंडी सर्वश्रुत आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे ही कोंडी कमीत कमी व्हावी, वाहने एका ठिकाणी थांबून न राहता ती धिम्या गतीने का होईना चालत राहावीत, याकरिता प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिक करत आहेत.

वेहेरगाव रोडवर होणार्‍या या कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील मुश्कील होत आहे. पर्यटक व भाविक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी.
– शिवाजी कुटे, स्थानिक नागरिक

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT