परभणीतील नाट्यकर्मींत तीव्र संताप; नाट्य परिषदेचया यादीत जीवंत कलावंताला दाखविले मृत | पुढारी

परभणीतील नाट्यकर्मींत तीव्र संताप; नाट्य परिषदेचया यादीत जीवंत कलावंताला दाखविले मृत

परभणी, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत परभणीतील एका जीवंत कलावंताला मृत दाखविले गेले आहे. तर मृत झालेल्या कलावंतांची नावे या यादीत आल्याने येथील नाट्यकर्मींत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिषदेने कलावंतांची खातरजमा करून यादी प्रसिद्ध करणे गरजेचे असताना झालेल्या या प्रकाराने आश्यर्चही व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेच्या वतीने आगामी निवडणुकांसाठी काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील कलावंतांची ही स्वतंत्र यादी आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील 33 कलावंतांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्याच्या यादीतील जवळपास 4 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झालेला आहे. त्यांची नावेही यादीत जशास तसी त्यांच्या सभासद क्रमांकासह आली आहेत. मात्र कलावंत मधुकर उमरीकर यांच्या नावावर फुली मारून त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. परभणी येथे सन 2000 मध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले होते. या संमेलनाच्या आयोजनातील नाट्य कलावंतांनी मिळून नाट्य परिषदेची परभणी शाखा स्थापन केली. या शाखेच्या माध्यमातून अनेक कलावंत पुढे आले.त्यापैकीच एक कलावंत असलेले मधुकर उमरीकर यांनी आपल्या शामची आई एकपात्री प्रयोगातून ऊेक विद्यार्थ्यांपर्यंत साने गुरूजी पोचविले. 1458 प्रयोग त्यांनी राज्यभर केलेले आहे. त्यांना नुकताच आचार्य पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामातून ते कलावंत घडविण्याचे काम करीत आहेत. मात्र नाट्य परिषदेने त्यांना मृत घोषीत केल्याने त्यांनी या प्रकाराची तीव्र नाराजी व्यक्त केली. नाट्य परिषदेने शाहनिशा करूनच यादी प्रसिद्ध करावयास हवी होती. परंतू तसे न करता जे हयात आहेत. त्यांना मृत दाखविणे व जे हयात नाहीत. त्यांना हयात दाखविण्याचा प्रकार चिड निर्माण करणारा आहे.

Back to top button