Zambre Family Pudhari
पुणे

Pune Dowry Harassment Case: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासऱ्यांना अटक; पतीसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या मजकुरातून सासूच्या भूमिकेचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रसिद्ध व्यावसायिक अरविंद झांबरे यांच्या कुटुंबातील सून पायल अक्षय झांबरे (वय ३४) हिच्या आत्महत्या प्रकरणात सासू, सासऱ्यांना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून पायल यांनी २ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात पती अक्षय झांबरे याच्यानंतर आता सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८) आणि सासरे अरविंद झांबरे (वय ६५, रा. मुकुंदनगर) यांना अटक केली आहे.

पायलचा भाऊ ऋषिकेश रवींद्र पवार (वय ३१, रा. खेड शिवापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात पती अक्षय, सासू मंगल, सासरे अरविंद आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पायलच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पती अक्षय झांबरेला अटक केली होती. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आता सासू आणि सासऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या मजकुरात आपल्या मृत्यूला सासू जबाबदार असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारी आणि आत्महत्येपूर्वीच्या मजकुराच्या आधारे पोलिसांकडून संबंधितांची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, झांबरे कुटुंबाचा पुण्यातील व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक असून, हॉटेलसह कार्यालये आणि बांधकाम व्यवसायात त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर पायल आत्महत्या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे. लग्नात लाखो रुपये खर्च करूनही पायल यांच्‍याकडून वेगवेगळ्या सणांना महागड्या वस्‍तू आणि पैशांची मागणी केली जात असल्‍याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत पती, सासू, सासरे यांना अटक झाली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT