

पुणे: दिवाळीच्या प्रसन्न पहाटे वातावरणात दरवळणारे भक्तिगीतांचे सूर, शास्त्रीय संगीताची गोडी अन् लोकप्रिय चित्रपटगीतांची सुरेल गुंफण... अशा सांगीतिक वातावरणात यंदाची दिवाळी अधिक संस्मरणीय करण्यासाठी ‘पुढारी सूर दीपावली’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सुरांच्या प्रकाशात उजळणारी एक रम्य पहाट’ ही संकल्पना घेऊन ‘पुढारी माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी प्रस्तुत हा सांगीतिक सोहळा भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर) रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांची पहाट स्वरमयी होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात पहाटे ५.३० ते सकाळी ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण आणि नात्यांमधील स्नेह अधिक दृढ करणारा सण. या सणाचे निमित्त साधून ‘पुढारी माध्यम समूहा’कडून दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नामवंत गायक-वादकांच्या सादरीकरणातून रसिकांना पहाटेच्या प्रसन्न प्रहरी संगीताचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. याच सांगीतिक परंपरेचा वारसा पुढे नेत यंदा ‘पुढारी सूर दीपावली’चे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सणातील आनंद, उत्साह आणि मांगल्याला संगीताची जोड देणाऱ्या या मैफलीत विविध संगीत रचनांसह चित्रपटगीतांचाही आनंद रसिकांना घेता येणार आहे. या सांगीतिक सोहळ्याचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट) हे फायनान्स पार्टनर आहेत. तसेच, अमर बिल्डर्स अँड प्रमोटर्स, कोहिनूर ग्रुप, चाटे ग्रुप आणि रविराज रिअल्टी हे सहप्रायोजक आहेत.
गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे दोघेही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीसाठी ओळखले जातात. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया, सुरेल आवाज आणि भावपूर्ण सादरीकरण, ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये आहेत. विविध संगीत प्रकारांतील रचनांना आपल्या आवाजातून वेगळी रंगत देणाऱ्या या कलाकारांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. शास्त्रीय संगीतापासून ते लोकप्रिय चित्रपटगीतांपर्यंत विविध रचनांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता येईल. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी ही दिवाळी पहाट विशेष पर्वणी ठरणार आहे.
रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश
‘पुढारी सूर दीपावली’ या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, कार्यक्रमासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे. गुरुवारपासून (दि. ५ नोव्हेंबर) प्रवेशिका उपलब्ध होणार असून, प्रवेशिका सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध असतील.
कार्यक्रम कधी आणि कुठे?
दिनांक : बुधवार, ११ नोव्हेंबर
वेळ : पहाटे ५.३० ते सकाळी ९
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता
येथे मिळतील मोफत प्रवेशिका, प्रवेशिका सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध असतील
दैनिक पुढारी कार्यालय, मित्रमंडळ चौक
ग्राहकपेठ, टिळक रस्ता
देसाई बंधू आंबेवाले, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता
अमराळे ज्वेलर्स-कुंटे चौक आणि जय हिंद चौक-लक्ष्मी रस्ता
मोदी केअर डिस्ट्रिब्युशन पॉइंट, सक्सेस स्क्वेअर सोसायटी, महर्षी कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड