Development Work Pudhari
पुणे

Patas Road Work Controversy: पाटसच्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा सवाल; सार्वजनिक निधी खासगी घरासाठी?

१०.५० लाखांच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; लाभार्थीचे नाव, लोकवस्ती आणि मंजुरीच्या कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पाटस: दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखडा रस्त्यालगत जिल्हा नियोजन समिती सदस्य वासुदेव काळे यांच्या माध्यमातून मंजूर रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनसुविधा २५१५-१५०५ अंतर्गत 'पाटस येथे तुषार सातव यांच्या घराकडे जाणारा रस्ता करणे' या कामासाठी सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा ठेका अक्षय मोहन सातव यांना मिळाला आहे. मात्र, हा रस्ता सार्वजनिक सुविधेसाठी की ठेकेदाराच्या खासगी घराकडे जाण्यासाठी करण्यात आला? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

मंजुरीच्या कागदपत्रांमध्ये 'तुषार सातव' यांचे नाव असले, तरी प्रत्यक्ष ठिकाणी तुषार सातव यांचे घर नसून ठेकेदार अक्षय सातव यांचा बंगला असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. दोघे भाऊ असून, एकत्र राहत असल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली. तसेच परिसरात मोठी लोकवस्ती नसून ठेकेदाराचे एक आणि त्यानंतर आणखी एका व्यक्तीचे घर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी मिळणारा शासकीय निधी एखाद्या व्यक्तीच्या खासगी घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वापरला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या मंजुरीवेळी सादर केलेली कागदपत्रे, लाभार्थीचे नाव, प्रत्यक्ष लोकवस्ती, रस्त्याची आवश्यकता, तसेच प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी यांची सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे.

तेथे १५ कुटुंबांची लोकवस्ती; ठेकेदाराचा दावा

दरम्यान, ठेकेदार अक्षय सातव यांच्याकडे माहिती घेतली असता, '१५ लोकांच्या कुटुंबासाठी हा रस्ता करण्यात आला आहे,' असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष पाहणीमध्ये तेथे १५ कुटुंबांची लोकवस्ती अथवा घरे नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या या दाव्याची अधिकृत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासावी

या प्रकरणात पुणे जिल्हा परिषद दक्षिण बांधकाम विभाग, तसेच संबंधित नियोजन यंत्रणेतील अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. रस्त्याच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंतची कागदपत्रे, अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, लाभार्थीचे नाव, मोजमाप पुस्तिका आणि निधीच्या वापराची माहिती सार्वजनिक करून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT