संतोष वळसे पाटील
मंचर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट हा तालुक्यातील सर्वांत चर्चेचा विषय ठरत आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निरगुडसर हे गाव येते. वळसे पाटील यांच्या पसंतीकडे राजकीय वर्तुळाची नजर लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी कोणाला मिळते, याबाबत पक्षातील कार्यकर्ते तसेच मतदार यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे.(Latest Pune News)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या दोन प्रमुख इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि वळसे पाटील यांचे निकटवर्तीय तसेच समर्थक माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे दोघेही इच्छुक असल्याचे समजते. या दोघांची कार्यशैली आणि लोकसंपर्क व्यापक असल्याने कोणाची निवड होणा? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. पक्षातील निर्णयात वळसे पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्यामुळे त्यांच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आंबेगाव तालुक्यात सध्या जिल्हापातळीवरील किंवा राज्यपातळीवरील कोणतेही महत्त्वाचे पद नाही. त्यामुळे या वेळेस तालुक्यातूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची शक्यता वर्तविली जात आहे. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट हा मतदारसंघ सर्वसाधारण श्रेणीत आल्यामुळे अध्यक्षपदाचा मार्ग याच गटातून मोकळा होण्याची दाट शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवितात. त्यामुळे या मतदारसंघातील लढत केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता जिल्हापातळीवर देखील लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत उमेदवारी मिळविण्यासाठी तगडी रस्सीखेच सुरू असून, कार्यकर्त्यांमध्येही वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांत उमेदवार घोषित झाल्यानंतर मतदारसंघातील समीकरणे अधिक स्पष्ट होतील.
पारगाव-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात महायुतीकडून तसेच महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे रवींद्र वळसे पाटील इच्छुक आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अद्याप तालुक्यात कुठल्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याने त्यांची भूमिका देखील गुलदस्तात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गटात ’राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना’ अशी लढत झाली होती. या लढतीत राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील यांनी त्या वेळी शिवसेनेत असलेले अरुण गिरे यांचा पराभव केला होता. मात्र, या वेळी राजकीय समीकरण बदलले असून. अरुण गिरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गत निवडणुकीत वळसे पाटील यांचा निसटता विजय
सन 2017 मध्ये पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गट - विवेक वळसे पाटील 13 हजार 883 मते मिळवून विजयी झाले होते. यासह अरुण गिरे 12 हजार 292 मते, सचिन टाव्हरे यांना 316 मते, बाबाजी देवडे यांना 180 मते, तर सुरेश वाव्हळ यांना 161 मते मिळाली होती.
विरोधक देखील सज्ज; चुरशीच्या लढतीची शक्यता
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड राहिला असला, तरी या वेळी विरोधकही सज्ज असून, लढत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांच्या मातृगावातील या मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.