खडकवासला: पानशेत व वरसगाव धरण खोऱ्यातील दुर्गम धरणग््रास्त, आदिवासी, मागास समाजातील मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या पानशेतमधील जिल्हा परिषदेच्या राज्यातील पहिल्या समूह शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे
या शाळेत राजगड तालुक्यातील 12 व हवेली तालुक्यातील दोन अशा 14 गावांतील व वाड्या वस्त्यांतील 154 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात निम्म्याहून अधिक विद्यार्थी आदिवासी कातकरी, महादेव कोळी तसेच धनगर समाजाचे आहेत. या शाळेमुळे शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांना शिक्षणाची सोय झाली आहे.
नुकत्याच झालेल्या राजगड तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेत मोठ्या गटात इयत्ता सातवीत शिकत असलेल्या दुर्गम मोसे बुद्रुकमधील आदिवासी कातकरी समाजाच्या जेसिका वाघमारे हिने मोठ्या गटात शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत व उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावला. तर इयत्ता सहावीत शिकणाऱ्या सांडवघर येथील धनगर समाजाच्या सूरज बावधने याने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. पानशेत, वरसगावच्या दुर्गम डोंगरी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत एक किंवा दोन, तीन, चार विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याचे तसेच गडगंज पगार घेणारे शिक्षक दांड्या मारत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
प्राथमिक शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्गम भागातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना साधे लिहता वाचता येत नाही. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेसह शारीरिक, मानसिक क्षमताही कमजोर असल्याने कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांच्यासाठी समूह शाळा प्रकल्प राबवण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी समूह शाळा प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
सध्या शाळेत सहा शिक्षक आहेत. एक शिक्षक कमी आहे. इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, शारीरिक शिक्षण नियमितपणे दिले जात आहे. इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी मराठीसह हिंदी-इंग््राजी भाषेत चांगले संभाषण करतात. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता सुधारली आहे. क्रीडा स्पर्धेत आदिवासी कातकरी समाजाच्या मुली, मुले जिल्हा पातळीवरील चांगली कामगिरी करत आहेत.शबाना खान, मुख्याध्यापिका, समूह शाळा, पानशेत
खासगी संस्थेच्या सामाजिक दायित्व योजनेतून शाळेसाठी सुसज्ज बहुमजली इमारत उभारण्यात आली. 2022-24 मध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू झाली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी दोन स्कूल बस सुरू आहेत. पानशेत कादवे-आंबेगाव, पानशेत-सांडवघर व पानशेत वरसगाव-मोसे या तीन वेगवेगळ्या मार्गावर बस सुरू आहेत. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 124 तर स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या 30 आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे नवीन दोन स्कूल बसची सोय करण्यात येणार आहे.
काबाडकष्ट आमच्या पाचवीला कायमचे पुजले आहे. राहण्याचे ठिकाणही कायमचे नसते. त्यामुळे मुलांना शाळा शिकवता येत नाही. समूह शाळेमुळे माझ्या मुलीसह समाजाच्या अनेक मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.ललिता वाघमारे, जेसिकाची आई
इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत तासिका, शारीरिक शिक्षण, नियमितपणे आरोग्य तपासणी, आजारी मुलांना तातडीने वैद्यकीय सेवा आदी सुविधांमुळे अवघ्या तीन वर्षांत शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली.
घरापासून गाडीची सोय झाल्याने मुलगा शिकत आहे. गाडी नसती तर मुलाला गुरेढोरे सांभाळावी लागली असती.रामचंद्र बावधने, सूरजचे वडील, सांडवघर