शिवनगर: अजित पवार यांची पसंती कोणाला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप)चा उमेदवार कोण याचीच उत्सुकता लोकांमध्ये आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण आरक्षित असल्याने अजित पवारांची सत्ता आल्यास या गटातील उमेदवाराला ती संधी मिळू शकते. (Latest Pune News) , , ,, , ,
पणदरे- सांगवी हा गट सर्वसाधारण उमेदवारांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, मात्र कोणीही पुढे येऊन मी इच्छुक असल्याचे सांगण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येईल असे चित्र आहे.
जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी पणदरे- माळेगाव हा गट अस्तित्वात होता, परंतु माळेगाव नगरीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे पणदरे- सांगवी असा गट तयार झाला, तर यासाठी पणदरे आणि मुढाळे असे दोन पंचायत समितीचे गण तयार झाले आहेत. यामध्ये पणदरे गण सर्वसाधारण उमेदवारासाठी व मुढाळे गण हा सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
पणदरे गणात एकूण मतदार जवळपास 21 हजार असून त्यामध्ये सांगवी, धुमाळवाडी, मानप्पावस्ती, पवईमाळ, पणदरे, कुरणेवाडी म्हसोबानगर आदी गावांचा समावेश आहे. मुढाळे गाणात एकूण जवळपास 23 हजार मतदार असून यामध्ये मेडद, माळेगाव खुर्द,नेपतवळण, मुढाळे, सोनकसवाडी, खामगळवाडी, ढाकाळे, भिलारवाडी, जळकेवाडी, माळवाडी (लोणी), जळगाव क.प., सायंबाचीवाडी आदी गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवारासाठी एकूण 44 हजार मतदार असतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होता, अर्थात शरद पवार व अजित पवार एकत्र असताना पणदरे - माळेगाव गट होता, तर माळेगावमधील रोहिणी रविराज तावरे यांना उमेदवारी मिळून त्या निवडून आल्या होत्या तर त्यापूर्वी पळशी येथील भाऊसाहेब करे यांना उमेदवारी मिळून ते देखील निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही निवडणुकीत पणदरे गावाची जिल्हा परिषद सदस्यपदाची संधी हुकली होती सांगावी - निरावागज गट असताना सांगवी गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीनाक्षी किरण तावरे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. अलीकडे राजकारणामध्ये अनेक बदल झालेअसून त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यामध्येच तालुक्यातील राजकारण फिरत आहे. भाजपची ताकद फारशी कुठेच दिसत नसून शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट यांचे अस्तित्व दिसत नाही.
पणदरे गावाला जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी मिळाली तर सांगवी गणातून सांगवी गावातील उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दुसरीकडे मुढाळे गाणातून माळेगाव खुर्द, ढाकाळे, मुढाळे, सायंबाचीवाडी आदी गावांतील उमेदवार पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो.
पणदरे- सांगवी या गटात जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची ताकद मोठी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तथा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे, त्यामुळे स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व युवा नेते युगेंद्र पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सांगवी गणातून सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांची भूमिका देखील महत्त्वाची समजली जाते. तर राज्यात महायुतीचे सरकार असून या निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती धर्माचे राजकारण कितपत पाळले जाईल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.