प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारपेठेची जोड दिली, तर निश्चितच त्यांच्या मालाला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यातही घेतलेले उत्पादन दर्जेदार असेल, तर जागतिक बाजारपेठ खुनावते, असा काहीसा अनुभव बारामती तालुक्यातील पणदरे पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना येत आहे. कारण, त्यांची केळी आता सीरिया देशात निर्यात होणार आहे.(Latest Pune News)
अलीकडच्या काळात साखर कारखानदारी पट्ट्यातील बहुतांश शेतकरी उसाच्या पिकाला पर्यायी पीक शोधत आहेत. उसाचे पीक जरी नगदी असले तरी त्याला लागणारा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर तसेच लागणारा वेळ याचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. त्याअनुषंगाने काळाची पावले ओळखत काही वर्षांपूर्वी पणदरे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येत केळी उत्पादन घेण्याचे ठरवले. त्याचवेळी हे उत्पादन दर्जेदार असावे तसेच ते निर्यात करता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. ऊस शेतीला पर्याय म्हणून केळीच्या पिकाकडे वळलेला शेतकरी दर्जेदार केळी उत्पादन घेऊ लागला; तथापि घेतलेल्या केळी उत्पादनाला बाजारपेठेची जोड दिली तर जास्तीचा दर मिळून फायदा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसले. यासाठी शेजारील जिल्ह्यांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला.
त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेतील चढ-उतार तसेच परदेशात निर्यातक्षम केळी उत्पादन व त्यासाठी घ्यावयाची काळजी यासाठी प्रयत्न होऊ लागले. याच माध्यमातून सीरिया येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पणदरे पंचक्रोशीतील केळीच्या बागा दाखवण्यात आल्या. संबंधित व्यापारी येथील बागा पाहून खुश झाले. त्यांनी निर्यात करता येणारी केळी कशा प्रकारची असावीत, याबाबत सांगितले आणि जाग्यावर येऊन त्यांच्या पद्धतीने केळीचे घड पॅकिंग करून नेण्याचे ठरवले. साधारणपणे 20 ते 25 रुपये प्रतिकिलो अशा दराने केळी जातील असा अंदाज व्यक्त केला. एकूणच दर्जेदार उत्पादन घेऊन त्याला जागतिक बाजारपेठेची जोड दिली तर निश्चितच शेती व्यवसाय फायद्याचा ठरेल हे मात्र नक्की...!
शेतीसंबंधित दर्जेदार उत्पादने घेण्यासाठी पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून ऊसशेती, फळबाग किंवा केळी शेती असेल यासाठी चर्चासत्रे घेण्यात येतात. यामध्ये अनेक वेळा जिल्हाबाहेरील तज्ज्ञ शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या उत्पादन केलेल्या शेतमालाविषयी माहिती जाणून घेतली जाते. यामध्ये मशागतीपासून ते विक्रीपर्यंत अनेक वेगवेगळे अनुभव मिळून याचा फायदा पणदरे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना होऊ लागला आहे.
केळीचे पीक हे 10 ते 12 महिन्यांत उत्पादित होते. यासाठी एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च येतो. जवळपास एकरी 30 टन केळीचे उत्पादन मिळते. जर प्रतिकिलो 20 ते 25 रुपये दर मिळाला, तर खर्च वजा जाता एकरी 4 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.संजय यशवंत जगताप, के. बी. कोकरे पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळ