पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी (दि. 2) दुपारी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ जांबुत आणि पिंपरखेड गावांमध्ये सोमवारी (दि. 3) कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. मात्र, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मृतदेह मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.(Latest Pune News)
संतप्त नागरिकांनी वन विभागाचे वाहन व बेस कॅम्प पेटवून दिले, तसेच पंचतळे व रोडेवाडी फाटा येथे बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. गेल्या दोन आठवड्यांतील हा बिबट्याच्या हल्ल्यातील तिसरा बळी ठरला आहे. तरीही वन विभाग व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जांबुत, पिंपरखेड, पंचतळे परिसरात सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. नागरिकांचा उद्रेक लक्षात घेऊन पंचतळे फाटा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
रोहन बोंबेच्या मृत्यूनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड भय पसरले असून, सोमवारी (दि. 3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालये पूर्णपणे बंद राहिली. वाड्या-वस्त्यांवर राहणारी मुले चार-पाच किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात; मात्र आता पालकांशिवाय घरा बाहेर पडायलाही ती घाबरत आहेत. भीतीच्या छायेत शिक्षण ठप्प झाले असून ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
राहू : नांदूर (ता. दौंड) येथे गेल्या दोन दिवसांपासून बिबट्यांचा वावर सुरू असल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. गावाजवळील शेतात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती नीलेश थोरात यांनी दिली. राहू येथील सोनवणे मळा परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील एका शेतकऱ्याचा, दोन बकर्यांचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचे शेतकरी सचिन नवले यांनी सांगितले. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी व पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरात शोधमोहीम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ले केल्याची माहितीही समोर आली आहे. गावक-यांना सतत सतर्क राहून आपल्या घराबाहेर रात्री न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी विशाल थोरात, पोपटराव बोराटे, अतुल बोराटे, नामदेव बोराटे, हेमंत घुले यांनी केली आहे. ग््राामस्थांनी प्रशासनाकडे तत्काळ सुरक्षेची मागणी केली असून, परिसरात अद्यापही दहशतीचे वातावरण कायम आहे.