पुणे

अन्यथा खंडणीचे गुन्हे दाखल करणार

backup backup

फायनान्स कंपन्यांना 'खंडणी विरोधी पथकाची' ची तंबी ; नियमांच्या योग्य अंमलबजावणीच्या सूचना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा 

फायनान्स कंपनीचे वसुली एजंट सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत.या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाने सर्व फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन तंबी दिली. वसुली करताना नियमांची अंमलबजावणी करा, अन्यथा एजंटवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात कामगारवर्ग मोठ्या संख्येत वास्तव्यास आहे.

तसेच, हातावर पोट असणारा मजूर वर्गाची देखील येथे मोठी संख्या आहे. कोरोनामुळे हा वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने फायनान्स कंपन्यांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत.

त्यामुळे वसुली एजंट शहरात घिरट्या घालून गोरगरिबांचे लचके तोडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील काही दिवसात फायनान्स कंपन्यांच्या एजंटने महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या घटना समोर आल्या आहे.

थेरगाव येथे तर एका एजंटने महिलेच्या घरासमोर जाऊन तोडफोड करीत दहशत माजवली. फायनान्स कंपनीचे एजंट गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने अनेक सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. परिणामी एजंटच्या बुरख्यात असलेल्या गुन्हेगारांचे आणखीनच फावले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या सूचनेनुसार पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

या बैठकीला नामांकित फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले.

तसेच, सर्वसामान्य नागरिकांकडून कर्ज वसुली करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्तीच्या सूचना केल्या.

'पुढारी'ने मांडली होती बाजू

कोरोनामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कामगार, मजूर, छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक यामध्य्ये मोठ्या प्रमाणात भरडले आहेत.

त्यामुळे फायनान्स कंपन्यांनी वसुली करताना सबुरीने घेण्याची गरज आहे. याबाबत सर्वप्रथम 'पुढारी'ने सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडली होती.

"फायनान्स कंपनीचे एजंट दादागिरी करीत महिलांशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी वाद विकोपाला गेल्याने गुन्हे देखील दाखल करावे लागले आहेत.

त्यामुळे फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन एजंट तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे एजंटने नियमबाह्य वसुली करण्याचा प्रयत्न केल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे" 

                                                                                      – अजय जोगदंड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक. "  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT