बीड : राजेवाडी जि. प. शाळेतील शिक्षिकेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
माजलगाव; पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिकेत अनेक दिवसांपासून वाद आहे. हा वाद वरिष्टांपर्यंतही पोहचला आहे. या वादामुळे ग्रामस्थांनी शाळाही बंद ठेवली होती. दरम्यान, शाळेतील शिक्षिकेने आज (शनिवार) (ता. ४) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर शिक्षिकेला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापक आणि सहशिक्षिका यांच्यात अनेक दिवसांपासून वाद
राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षिका यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला. शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांना लागली. त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्याना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती.
शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण भेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सोमवारी (ता. ६) सुनावणी ठेवली होती. त्या अगोदरच शिक्षिकेने आज सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्यानंतर ११ वाजण्याच्या दरम्यान विष घेतले.
यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले. त्यांनी तात्काळ शिक्षिकेला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापकांच्या वादातूनच शिक्षिकेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
हे ही वाचा :
- Trump vs Putin : अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अडकविण्यासाठी रशियन अध्यक्षांनीच रचला होता 'हनीट्रॅप'
- Omicron News : पॉझिटिव्ह बातमी; ३८ देशांमध्ये पसरलेल्या ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, सगळे ठणठणीत
- amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर 'यामुळे' केबीसी होस्ट करायची वेळ आली, भावूक हाेत म्हणाले…
- Indian Navy Day : जाणून घ्या, ४ डिसेंबरला का साजरा केला जातो नौदल दिन..

