पुणे: सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटीसा, न्यायालयीन प्रकरणांमधील नोटिसा तसेच महाराष्ट्र महसूल संहितेतील अपिलांमधील नोटिसा आता तलाठ्यांकडून पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन देण्यात येणार आहेत. त्यानंतर पोस्ट ऑफिसमधून या नोटिसा थेट पक्षकारांना बजावल्या जाणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार असून, पक्षकारांनाही या नोटिसा या बजावल्या जाणार याची खात्री करता येणार आहे. ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे. पुढील दोन महिन्यांत हा उपक्रम राज्यभरातील सर्वच गावांमध्ये सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
गावपातळीवर महसूल विभागाचा प्रतिनिधी म्हणून तलाठी काम करत असतो. नागरिकांपर्यंत माहिती पोचविण्यासाठी तलाठी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नोटिसा काढत असतो. त्यात खरेदी-विक्री झाल्यानंतर संबंधितांना त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात. वारस नोंदी घेताना देखील अशा स्वरूपाच्या संबंधितांना नोटिसा बजावल्या जातात. त्याचप्रमाणे न्यायालयीन, अपिलाच्या नोटिशीसह फेरफार या नोटीसादेखील तलाठ्याकडून बजावल्या जातात. याची संख्या मोठी असल्याने तलाठ्यांवर कामाचा मोठा भार असतो.
अनेकदा संबंधित पक्षकारांना नोटीस बजावूनही त्या मिळत नाहीत. कार्यालयीन कामकाजामुळे देखील तलाठ्यांकडून वेळेत नोटीस देणे होत नाही. यावर उपाय म्हणून भूमी अभिलेख विभागाने आता या नोटिसा ऑनलाईन बजावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तलाठ्याकडे आलेली नोटीस ऑनलाइन पद्धतीने पोस्ट ऑफिसमध्ये दिली जाणार आहे.
पोस्ट ऑफिस ही नोटीस प्रिंट करून ती संबंधित पक्षकाराला रजिस्टर पोस्टाने पाठवणार आहे. संबंधित पक्षकाराला नोटीस बजावण्यात आल्याचे नोटिफिकेशन तलाठ्याकडे जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर त्याची पोच ही ऑनलाइनच तलाठ्याला मिळणार आहे. त्यामुळे आता तलाठ्याला ऑफलाईन पद्धतीने नोटीस बजावण्याची गरज भासणार नाही. तसेच यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या तक्रारींनासुद्धा लगाम बसणार आहे.
मावळ तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर काम
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वाऊंड आणि साते या दोन गावांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची चाचणी यशस्वी झाली असून, पुढील दोन महिन्यांत या उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या नोटिसा तलाठ्यांकडे आल्यानंतर त्या पोस्ट ऑफिसकडे पाठवण्यात येणार आहेत. पोस्ट ऑफिसच प्रिंट करून त्यावर योग्य ते तिकीट लावून पक्षकाराकडे पाठवणार आहे. त्याचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवले जाणार असून, ते तलाठी पाहू शकतील.विकास गजरे, संचालक आयटी, भूमी अभिलेख विभाग, पुणे