नायगाव: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने पुरंदर तालुक्याचे रण गाजत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून आली. यामध्ये अनेक होतकरू युवकांना डावलले गेले, तर बहुतांश ठिकाणी पैसेवाल्यांना आयात करून उमेदवारी दिली गेली. परिणामी, होतकरू आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना अपेक्षेप्रमाणे तिकिटे मिळाली नाहीत. त्यांना वेटिंग लिस्टवर समाधान मानावे लागले.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस बेलसर, दिवे, गराडे, वीर, भिवडी आणि निरा-कोळविहिरे अशा चार जिल्हा परिषद गट आणि त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समिती गणांची निवडणूक सध्या रंगात आली आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष व दोन्ही राष्ट्रवादी कॉंग््रेास एकत्र व काँग््रेास, असे चौरंगी लढतीचे चित्र तालुक्यात स्पष्ट झाले आहे.
सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याने कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही? हा प्रश्न पुरंदरमधील सर्वच राजकीय पक्षांसमोर उभा ठाकला होता. यामुळे सर्वच पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास दमछाक झाली.
शेवटच्या क्षणी मात्र अनेक पक्षांत बहुतांश ठिकाणी पैसेवाले उमेदवार पाहावयास मिळाले. ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने इतर पक्षांत तिकिटासाठी रांगच रांग दिसून आली. सर्वसामान्य कुटुंबांतील होतकरू युवकांना मात्र तिकिटे मिळाली नाहीत. काहींना जिल्हा परिषदेवरून पंचायत समितीची उमेदवारी घ्यावी लागली, तर काही युवकांना अखेरपर्यंत वेटिंग लिस्टमध्ये समाधान मानावे लागले.
आयात उमेदवार आणि पैसेवाले असा नियम सध्या दिसत असल्याने सर्वच पक्षांत अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक दिसत आहे. 27 जानेवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवसापर्यंत कोणता पक्ष आपल्या पक्षातील अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडेल, यावर पुढील राजकीय गणिते व त्यांची उत्तरे अवलंबून आहेत.