Medicine Pudhari
पुणे

Self Medication Risks Online Medicine: ऑनलाइन औषधांमुळे धोका वाढतोय; डॉक्टरांचा सेल्फ-मेडिकेशनवर इशारा

ब्लिंकिट, झेप्टोसारख्या ॲप्समुळे औषधे सहज उपलब्ध; मात्र सेल्फ-मेडिकेशनमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ब्लिंकिट, झेप्टोसारख्या ॲप्समुळे घरबसल्या औषधे मागविणे सोपे झाले आहे. मात्र, स्वतःहून (सेल्फ-मेडिकेशन) औषधे घेण्याचा वाढता ट्रेंड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. शहरात ऑनलाइन शॉपिंग ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारख्या किरकोळ आजारांवरील औषधे सहज उपलब्ध झाली आहेत.

प्रिस्क्रिप्शन अपलोड केल्यावर किंवा ॲपवरून डॉक्टरांचा फोन येऊन औषधे सुचवली जात असली, तरी अनेक जण लक्षणे पूर्ण न समजून औषधे मागवत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्दी-खोकल्यासारख्या सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमागे कधी कधी गंभीर आजारही दडलेले असू शकतात. अशा वेळी फक्त ॲपवरून औषधे घेऊन त्या आजाराची लक्षणे दाबल्यास मूळ आजार बळावण्याचा धोका वाढतो. तसेच चुकीची औषधे घेतल्यास ॲलर्जी, साइड इफेक्ट्‌‍स किंवा औषधांमधील परस्परसंवाद (ड्रग इंटरॅक्शन) यामुळे गुंतागुंत होऊ शकते.

कोणत्याही औषधाच्या सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक

उच्च क्षमतेची किंवा कर्करोग, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील औषधे या ॲप्सवर उपलब्ध नाहीत, ही जमेची बाब आहे. मात्र, डॉक्टरांचा सल्ला न घेता मागवल्या जाणाऱ्या या किरकोळ औषधांचाही अयोग्य वापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

स्वमर्जीने अँटिबायोटिक सेवन वाढवतेय उपचारांत गुंतागुत

साधी लक्षणे दिसत असली तरी स्वत:च्या मनाने अँटिबायोटिक मागवण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, ज्या जीवाणूंवर ही औषधे प्रभावी होती, ते आता औषधांना प्रतिकार करू लागले आहेत. ही स्थिती अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणून ओळखली जाते. डॉक्टरांच्या मते, अशा जीवाणूंवर सामान्य औषधे निष्प्रभ ठरत असून, उपचारांची गुंतागुंत वाढत आहे. रुग्णांनी स्वतःहून अँटिबायोटिक घेणे, डोस अपुरा ठेवणे किंवा उपचार अर्धवट सोडणे ही सर्वांत मोठी चूक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या गैरवापरामुळे औषधांचे परिणाम कमी होत आहेत आणि काही संसर्गांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक किंवा महागडी औषधे वापरण्याची वेळ येत आहे.

ॲप्सवरून औषधे देताना कथित डॉक्टरांकडून फोनवर प्राथमिक माहिती घेतली जात असली, तरी प्रत्यक्ष तपासणी होत नसल्यामुळे निदान अचूक होण्याची शक्यता कमी असते. विशेषतः रक्तदाब, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी अशा पद्धतीने औषधे घेणे टाळावे.
डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT