

पुणे: मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (एक्स्प्रेस वे) विस्ताराचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला असून, हा मार्ग आता 10 पदरी करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सध्या 94.6 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने विस्ताराची गरज निर्माण झाली होती.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिक विकास आणि वाहनांची संख्या लक्षात घेता विद्यमान सहापदरी मार्ग अपुरा पडत आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
काही वेळा अपघात किंवा बिघाडामुळे 10 ते 12 तासांपर्यंत वाहनांची रांग लागल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर मार्गाचे 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा वेग वाढणार असून, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध असल्याने प्रकल्पात मोठे अडथळे येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी मार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
दरम्यान, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून, त्यासाठी टोलवाढीचा प्रस्तावही विचाराधीन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास अधिक सुकर, जलद आणि सुरक्षित होणार असून, राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.