ओतूर: आधीच दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारे कवडीमोल बाजारभाव, खत-बियाणे आणि औषधांच्या गगनाला भिडलेल्या किमती, त्यात आता कांदा लागवडीच्या मजुरीने गाठलेला ११०० ते १२०० रुपयांचा उच्चांक अशा दुहेरी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. कांदा लागवडीसाठी वाढविण्यात येणाऱ्या मजुरी दरावर नियंत्रण आणावे, या मागणीसाठी डिंगोरे, बल्लाळवाडी आणि उदापूर परिसरातील शेतकरी व युवा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या परिसरात कांदा लागवडीसाठी एका मजुराला ११०० ते १२०० रुपये रोजंदारी द्यावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी १०००, ११०० आणि १२०० रुपये असे वेगवेगळे दर सुरू आहेत. विशेष म्हणजे, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात कांदा विक्रीचे पैसे आले असून, बहुतांश शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत वाढती मजुरी परवडणार कशी, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बाहेरील गावांमधून येणारे शेतकरी आळेफाटा, राजुरी, बेल्हे, आळकुटी आदी परिसरांतून येत असून, मजुरीचे वाढीव दर कबूल करून मजूर घेऊन जाण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याशिवाय मजूर पुरविणाऱ्या एजंटांचा हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी( दि. १८) रोजी सकाळी ठीक सात वाजता बनकर फाटा येथे ओतूर, डिंगोरे, बल्लाळवाडी, उदापूर अन्य परिसरातील शेतकरी व युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र जमावे व या ज्वलंत प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढून मजुरीचे दर परवडणाऱ्या मर्यादेत ठेवण्याबाबत एकत्रित भूमिका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
शेती करायची की शेती विकायची?
शेतीसाठी लागणारे खत, औषधे, बियाणे, मशागत आणि मजुरी यांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शेतीमालाला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने शेती करायची तरी कशी? वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहत असून, शेती विकण्याची किंवा टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
एक तास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी द्या
परिसरातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्त्यांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सकाळी सात वाजता बनकर फाटा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मजुरीच्या वाढत्या दराबाबत एकजूट दाखवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक निर्णय घेण्याची भूमिका आयोजकांकडून मांडण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कांदा लागवडीच्या मजुरीचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, या मागणीवर प्रशासन, मजूर संघटना आणि संबंधित घटक काय भूमिका घेतात, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.