पुणे

वाहन एकच; बिले अमाप : पुणे महापालिकेचा अजब कारभार

अमृता चौगुले

पांडुरंग सांडभोर

पुणे : कल्पना करा.. कचरा वाहतूक करणारे एकच वाहन एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन ठिकाणी काम करू शकते का? नाही ना..? पण महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांनी हा चमत्कार करून दाखविला आहे. एकाच वाहनाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांत काम केल्याचे दाखवून काही लाखांची बोगस बिले काढली आहेत.

कचरा वाहतुकीच्या नावाखाली स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराने कशा पध्दतीने खोटी बिले देऊन महापालिकेची लूट केली, याचा धक्कादायक प्रकार बिलांच्या चौकशीत समोर आला आहे. वारजे आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालय या दोन्ही कार्यालयांमध्ये एकाच वाहनाच्या नावाखाली तब्बल वर्षभर दोन वेगवेगळी बिले काढली गेली. त्यात एमएच 08 एच 0985 या क्रमाकांच्या वाहनाने जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत वारजे आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांकडे 537 दिवस कागदोपत्री काम केल्याचे भासवून तब्बल 905 खेपांचे 21 लाख 33 हजार 525 रुपयांची बिले काढली गेली.

धक्कादायक म्हणजे, या वाहनाच्या बेस रेकॉर्डची माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी 1 आणि फेरी संपेपर्यंत हे वाहन एकाच वेळी वारजे आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काम करीत असल्याचे दाखविण्यात आले. वारजे आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचा कचरा एकाच ठिकाणी म्हणजेच कोथरूड कचरा डेपो या ठिकाणी आणून त्या ठिकाणी वजनाच्या व फेर्‍यांच्या नोंदी घेतल्या जातात. तसेच नोंदी घेणारे कर्मचारीही एकाच कार्यालयात शेजारी बसतात, त्याच ठिकाणी अशा बोगस नोंदी करण्यात आल्या आहेत.

अशी अनेक वाहने

ज्या पध्दतीने एकाच वाहनाची दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या नावाखाली खोटी बिले काढली गेली, त्यात केवळ हे एकच वाहन नाही तर ठेकेदाराकडील एमएच 12 एयू 1361 आणि एमएच 12 एनएक्स 5618 या दोन वाहनांच्या माध्यमातून अशीच बोगस बिले काढली गेली असल्याचे समोर आले आहे.

चालक, हेल्पर बोगस

बोगस वाहनांच्या नावाखाली बिले काढताना त्यावरील वाहनचालक आणि हेल्पर बोगस आहेत. स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराने संंबंधित वाहनावरील वाहक आणि हेल्पर यांची जी नावे दिली आहेत, तीही बनावट असल्याचे आढळून आले आहे. संबंधित कर्मचार्‍यांची ना हजेरी आढळून आली, तसेच त्यांचा ईएसआय, पीएफ भरल्याची नोंदही नाही.

तपासणी न करता बिले

महापालिकेने ठेकेदाराला बिले देण्यापूर्वी करारातील अटी-शर्तींनुसार जीपीआरएसच्या नोंदी, वाहनाच्या लॉगबुकमधील नोंदी, तसेच स्वयंभू ट्रान्सपोर्ट ठेकेदाराने जारी केलेल्या व संबंधित अधिकार्‍याने रोजच्या रोज पडताळणी केलेले लॉगशीट आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तपासणी न करताच ही बिले दिली असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

कार्यकर्त्यांना जमले

काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. बहिरट यांचे कार्यकर्ते सचिन बहिरट आणि बाबा सय्यद यांनी ठेकेदाराला दिलेल्या प्रत्येक बिलाची माहिती अधिकारात माहिती घेऊन त्यांची तपासणी केली. त्यात ही बोगस वाहने आणि त्यावरील बोगस कर्मचारी यांचा पर्दाफाश झाला. त्यामुळे जे कार्यकर्त्यांना जमले ते गल्लेलठ्ठ पगार घेणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍यांना का जमले नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

SCROLL FOR NEXT