पुणे

पुणे : कान्हेवाडीच्या पोलिस पाटलानेच केला खून; तिघे अटकेत

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक भागातील खुनाच्या थरारक घटना सुरूच आहेत. किरकोळ कारणावरून कोयत्याने सपासप वार करून एकाचा खून झाल्याची घटना कान्हेवाडी (ता. खेड) येथे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे या घटनेत खुद्द गावच्या पोलीस पाटलाने मित्रांच्या मदतीने हा खून केल्याची बाब समोर आली आहे.

म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी एकाचा कोयत्याने वार करत खून केला आहे. गुरुवारी दिवसभर याबाबतीत काहीही चर्चा झाली नाही; मात्र सायंकाळच्या सुमारास सोशल माध्यमांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून पोलीस पाटलासह तिघांना अटक केली आहे.

दिनेश मच्छिंद्र बहीरट (वय ३६, रा. कान्हेवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयूर दगडू येवले यांनी या प्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस पाटील राजेश येवले याच्यासह ओंकार ढोरे, प्रसाद येवले (सर्व रा. कान्हेवाडी, ता. खेड) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेले दिनेश बहिरट हे येवले यांच्या घरासमोरून गाडी बाजूला घेत होते. त्या वेळी पोलीस पाटील राजेश येवले यांच्याशी त्यांचे भांडण झाले. त्या दरम्यान, आरोपी ढोरे आणि प्रकाश येवले हे हातात कोयते घेऊन आले. ढोरे याने फिर्यादी येवले यांच्यावर पहिला वार केला. मात्र, त्यांनी तो हुकविला. या वेळी कोयत्याचे टोक त्यांच्या जर्किनमध्ये अडकून त्यांचे जर्किन फाटले. त्यानंतर आरोपी असलेला पोलीस पाटील राजेश येवले आणि अनोळखी आरोपीने फिर्यादी यांना मागून पकडले. तसेच आरोपी ढोरे आणि प्रसाद येवले यांनी दिनेश यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांना जीवे मारले. महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT