पुणे

विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइनच; महाविकास आघाडी सरकारची भूमिका

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. परंतु, आता परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा ऑफलाइन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचीही परीक्षा ऑफलाइन घेण्याचीच भूमिका आहे,' अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी परीक्षा, वसतिगृह आणि शुल्काबाबत माहिती दिली. सामंत म्हणाले की, परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन, असे दोन्ही पर्याय दिले आहेत. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. त्यांच्याशी चर्चा करून परीक्षांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, असे म्हणणे योग्य नाही.

राज्य सरकार कायमस्वरूपी ऑनलाइन परीक्षा घेणार आहे, असा गैरसमज कोणी पसरवत असतील, तर ते चुकीचे आहे. आगामी दिवसांत ऑफलाइन परीक्षांकडे आपल्याला वळावे लागणार असून, सरकारची देखील तीच भूमिका आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबतच्या कोणत्याही सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या नसून, परिपत्रक बवावट असल्याचे त्यांनी सांगितले.

शुल्ककपात न करणार्‍या महाविद्यालयांवर तक्रार आल्यास कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साधारण 80 टक्के महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शुल्कात तसेच शुल्क भरण्याबाबत सवलती दिल्या आहेत. मात्र, काही महाविद्यालये शुल्काबाबत अजूनही आडमुठी भूमिका घेत आहेत. या महाविद्यालयांची विद्यार्थी किंवा पालकांनी तक्रार केल्यास त्यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी केली जाईल. आमच्यापर्यंत जोपर्यंत लेखी स्वरूपात तक्रारी येत नाहीत तोपर्यंत दोष देणे योग्य नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक महाविद्यालयांनी शुल्क कमी केल्याचे सामंत यांनी सांगितले.

परिस्थितीचा विचार करूनच वसतिगृहाबाबत निर्णय

वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांत कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा प्रकार आला आहे. या नव्याने उद्भणार्‍या परिस्थितीबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. आता वसतिगृहे सुरू केल्यानंतर दुर्दैवाने तिसरी लाट आल्यावर पुन्हा क्वारंटाइन सेंटर्स सुरू करावी लागणार आहेत. त्यामुळे जागा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या आम्ही शांतपणे एकूण परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार आहोत.

SCROLL FOR NEXT