पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या यूपीआय पेमेंटला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समस्या येत आहेत. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी तर अनेक प्रवाशांना बसप्रवासादरम्यान यूपीआयद्वारे तिकिटाचे पेमेंट करता आले नाही.
परिणामी, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद रोखून त्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमपीने 'यूपीआय क्यू आर कोड' यंत्रणा सुरू केली. यासाठी तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी या सेवेला चांगला प्रतिसाददेखील मिळत होता आणि यापुढेही मिळत राहणार आहे. मात्र, सिंह यांची बदली होताच, पीएमपीतील वाहकांनी आणि अधिकार्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
प्रवाशांनी तिकिटासाठी 'क्यू आर कोड' ची मागणी केली तरी वाहकांकडून यूपीआयचा क्यू आर कोड प्रवाशांना दिला जात नाही. याउलट वाहक यूपीआयसंदर्भात विविध कारणे सांगत प्रवाशांकडे पुन्हा कॅश आणि सुट्ट्या पैशांची मागणी करत आहेत. यासंदर्भात प्रवाशाने वाहकाकडे चर्चा केली तर ते प्रवाशांशीच उद्धटपणे बोलत आहेत. यामुळे आता यावर पीएमपीचे नवे अध्यक्ष संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर काय उपाययोजना करणार हे पाहावे लागणार आहे.
पीएमपीच्या यूपीआय तिकीट यंत्रणेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिमकार्ड रिचार्जची कोणतीही तांत्रिक समस्या नाही. फक्त अनेकदा अधून-मधून मशीनचा सर्व्हर डाऊन होत असतो. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अशीच सर्व्हर डाऊनची समस्या आली होती. ती सोडविण्यात आली आहे. वाहकांना तिकिटासाठी यूपीआय क्युआर कोडचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
वाहकांकडून अनेक प्रवाशांना तिकिटासाठी 'यूपीआय' मशीन दिले जात नाही किंवा त्यांना अनेकदा दमदाटी करून ऑनलाइन पेमेंट करण्यास रोखले जात आहे. याबाबतच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी ट्वीटरवर केल्या आहेत. मात्र, अशा तक्रारी करूनसुध्दा, पीएमपी प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रवाशांनी यूपीआयबाबत वाहकांकडे मागणी केली तर पीएमपीचे वाहक प्रवाशांशी उद्धटपणे वागतात. तसेच, मशीनचा सर्व्हर डाऊन झाला आहे, ठेकेदाराकडून मशीनचे रिचार्ज मारले गेले नसल्याने ते संपले आहे, नेटवर्क प्रोब्लेम आहे. अशी कारणे वाहक देत आहे. कारण, ऑनलाइन यंत्रणेमुळे तिकिटामध्ये घोटाळा करता येत नसल्याने वाहक सर्रासपणे या यंत्रणेला फाटा देत आहे. असेच चालत राहिले तर पीएमपीचे उत्पन्न कसे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा