समाजसेवा, कला, साहित्य, विज्ञान आदी क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरी बजावणार्यास भारतरत्न दिला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण हे प्रथम पुरस्कार विजेते ठरले. केवळ राजकीय क्षेत्राचा विचार केल्यास जवाहरलाल नेहरू, गोविंदवल्लभ पंत, डॉ. विधानचंद्र रॉय, पुरुषोत्तमदास टंडन, डॉ. राजेंद्रप्रसाद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, कामराज, एम. जी. रामचंद्रन, राजीव गांधी, सरदार पटेल, मोरारजी देसाई, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बोरदोलोई, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी प्रभूतींना आजवर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नुकताच बिहारमधील शोषित-वंचितांचे नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात आल्यामुळे या तपस्वी नेत्याचा उचित गौरव झाला आहे. अडवाणी यांचा सन्मान हा भावनिक क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. मोदी हे अडवाणींचे शिष्य मानले जातात. अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेत प्रमोद महाजन आणि मोदी हे दोघेही होते. अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. रथयात्रेचे नेतृत्व, तसेच पक्षाच्या संघटनेची घट्ट बांधणी केल्यामुळेच भाजप सत्तेवर येऊ शकला.
सांस्कृतिक राष्ट्रवादाची पेरणी करताना बहुसंख्याकांच्या धार्मिक भावना जागवण्याच्या दीर्घकालीन नियोजनाचा तो भाग होता, त्याचे खंबीर नेतृत्व अडवाणी यांनी केले. भाजप सत्तास्थानी पोहोचला त्यामागे त्यांचे योगदान मोठे होते. अडवाणींचा जन्म कराचीचा आणि तेथूनच 1942 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लवकरच पूर्णवेळ प्रचारक म्हणून राजस्थानात काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर ते त्याचे काम करू लागले. देशाच्या फाळणीनंतर 1947 मध्ये अडवाणी सिंध प्रांतातून असंख्य सिंधवासीयांप्रमाणेच दिल्लीला स्थलांतरित झाले. सिंधी समाज हा विलक्षण कष्टाळू आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा म्हणून ओळखला जातो. दिल्लीत आल्यानंतर 10 वर्षांतच त्यांनी वाजपेयी यांच्यासह जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कामकाजात मदत करण्यास सुरुवात केली.
लवकरच ते दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिव बनले. पुढे दिल्ली महानगरपालिका आणि विधासभेत जनसंघ-भाजपची सत्ता आली. 1960 मध्ये त्यांनी संघाच्या 'ऑर्गनायझर' या नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे, 'ऑर्गनायझर'मध्ये ते 'नेत्र' या टोपण नावाने चित्रपटविषयक लिखाण करत. सिनेमाची त्यांना मुळातच प्रचंड आवड आणि त्यामुळे मनोजकुमार असो की आमीर खान, त्यांचे सिनेमे ते आवर्जून पाहत. 1962 मध्ये 'ऑर्गनायझर'चे तेव्हाचे संपादक के. आर. मलकानी यांना हार्वर्डची फेलोशिप मिळाल्यामुळे अंकाच्या संपादकपदाची जबाबदारी अडवाणींवर आली. त्या काळात अडवाणींनी भारत-चीन युद्ध तसेच 1965 च्या भारत-पाक युद्धाचे उत्कृष्ट वार्तांकन केले. त्यांच्या संपादकीय लिखाणाची शैलीही भेदक होती. अडवाणींनी आपल्या साप्ताहिकात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा 'पोलिटिकल डायरी' नावाचा कॉलमही सुरू केला होता; मात्र 1967 मध्ये 'ऑर्गनायझर'ची जबाबदारी सोडून अडवाणींनी पूर्णवेळ राजकारणाला वाहून घेण्याचे ठरवले.
1970 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आणि आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने त्यांनी राज्यसभा आणि नंतर लोकसभाही गाजवली. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीत अडवाणींनी तुरुंगवासही भोगला आणि पुढे जनता पक्षाच्या राजवटीत ते केंद्रीय माहिती आणि नभोवाणीमंत्री झाले. नभोवाणीमंत्री म्हणून सूत्रे हाती घेताच इंदिराजींनी लादलेली सेन्सॉरशिप हटवून त्यांनी वृत्तपत्रांना स्वातंत्र्य बहाल केले. त्यांनी प्रसिद्ध पत्रकार बी. जी. वर्गिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून रेडिओ आणि दूरदर्शनला स्वायत्तता देण्याच्या द़ृष्टीने वाटचाल सुरू केली. इंदिरा गांधींनी ज्या वृत्तपत्रांना काळ्या यादीत टाकले होते, त्यांना पुन्हा जाहिराती देण्यास सुरुवात केली. विदेशी वृत्तपत्रांच्या भारतातील प्रतिनिधींची इंदिराजींनी देशातून हकालपट्टी केली होती, त्यांना पुन्हा परतण्यास परवानगी दिली. पुढे जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतरही त्यांनी वाजपेयींसह जनता पक्षात विलीन झालेल्या जनसंघाचे रूपांतर 'भारतीय जनता पक्षा'त केले. इंदिराजींच्या हत्येनंतर भाजपचा दारुण पराभव होऊन, पक्षाचे केवळ दोनच खासदार निवडून आले. त्यावेळी खचून न जाता 'पुनश्च: हरिओम' म्हणून त्यांनी पक्षकार्यास सुरुवात केली.
1986 मध्ये त्यांची वाजपेयींच्या जागी पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर काही वर्षांतच पालमपूर येथील अधिवेशनात विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिराच्या चळवळीस समर्थन देण्याचा ठराव भाजपने मंजूर केला. व्ही. पी. सिंग यांच्या आघाडीच्या सरकारला बाहेरून पठिंबा देण्याचा निर्णय अडवाणींनीच घेतला होता. परंतु, व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी राबवण्याची घोषणा केल्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंदूंच्या एकतेस धोका निर्माण होईल, असे अडवाणींना वाटले. त्यामुळे त्यांनी लगेचच सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेची घोषणा केली. या यात्रेला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि त्यांची लोकप्रियताही वाढली. हवाला गैरव्यवहार प्रकरणात ठपका आल्यानंतर 1996 मध्ये अडवाणींनी निवडणूक लढवली नाही. या आरोपातून निष्कलंक होऊन ते बाहेर पडले.
वाजपेयी सरकारात गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून अडवाणींनी प्रभावी कामगिरी केली. मुळात आपल्यापेक्षा वाजपेयी हे रालोआ आघाडीतील घटक पक्षांना अधिक स्वीकारार्ह नेते वाटतील, हे लक्षात घेऊन दुय्यम भूमिका घेण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. 2004 ते 2009 या काळात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी संसद गाजवली. वाराणसी येथे 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 'भारत सुरक्षा यात्रा'ही काढली. 2005 मध्ये बॅरिस्टर जीना यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यामुळे वादंग होऊन, त्यांना पक्षाध्यक्षपद सोडावे लागले होते. लोहपुरुष अडवाणी हे जहाल हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासारखा देशाला आणि पक्षाला समर्पित असलेला नेता क्वचितच पाहायला मिळतो.