सोलापूर : कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांचे पुण्याकडे प्रस्थान | पुढारी

सोलापूर : कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांचे पुण्याकडे प्रस्थान

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : धर्म आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी 1 फेब्रवारीपासून सोलापूरच्या वास्तव्यास असलेले कांची कामकोटी पीठाचे 70 वे जगद्गुरू शंकराचार्य पूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती रविवारी दर्शन, पूजा, विधी उरकून सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाले. सोलापूरच्या वास्तव्यात जगद्गुरूंनी भाविकांना दर्शन, पूजा आणि प्रवचनातून प्रबोधन केले. यावेळी श्री चंद्रमौलेश्वर पूजेची अनुभूती सोलापूरकरांनी अनुभवली.

गुरुवारी 1 फेब्रुवारीला सोलापुरात त्यांचे आगमन झाले. पद्मनगर, कर्णिकनगर येथील म्याकल यांच्या निवास्थानी ते वास्तव्यास होते. सकाळी भाविकांना दर्शन, सकाळी 7 वा. चंद्रमौलेश्वर पूजा, सुवासिनींचे ओटी भरणे, गाय-वासरू पूजन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शनिवारी सायंकाळी दाजी पेठेतील व्यंकटेश सांस्कृतिक भवनमध्ये त्यांनी प्रवचनही केले. रविवारी त्यांचे पुण्याकडे प्रस्थान झाले. थेऊर येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन ते थेऊर येथेच रविवारी मुक्काम केला. सोमवारी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात ते जाणार आहेत. तेथून पुढील यात्रेला ते मार्गस्थ होणार आहेत. सोलापूर निरोपाच्यावेळी जनार्दन कारमपुरी, मोहनराव दाते, श्रीधर म्याकल, जयंतराव श्रीगांधी, व्यंकटेश चिलका यांच्यासह पदाधिकारी व भक्त उपस्थित होते.

Back to top button