Jejuri Pudhari
पुणे

Somvati Amavasya Jejuri: येत्या सोमवारी जेजुरीत सोमवती यात्रा नाही

अमावस्येचा सूर्योदय सोमवारी नसल्याने खंडोबा पालखी सोहळा रद्द

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी: येत्या सोमवारी (दि.१६) अमावस्येच्या प्रारंभ सायंकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होत असून मंगळवारी समाप्त होत आहे. सोमवती अमावस्या ही सूर्योदय काळात येत नसल्याने सोमवती उत्सव नसल्याने खंडोबा देवाचा पालखी सोहळा क-हा स्नानासाठी निघणार नसल्याचे मुख्य मानकरी इनामदार राजाभाऊ पेशवे तसेच श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले आहे.

रविवारी (दि.१५)महाशिवरात्री उत्सव सुरू होत आहे . या काळात मुख्य मंदिरामध्ये त्रैलोकीच्या शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. वर्षातून एकदाच ही शिवलिंगे धार्मिक विधी व दर्शनासाठी खुली होत असल्याने पोलीस प्रशासन ,नगरपालिका , विश्वस्त मंडळ ,ग्रामस्थ ,पुजारी ,सेवेकरी मंडळाने बैठक घेत उत्सवाचे नियोजन केले आहे .

सोमवारी सायंकाळी अमावस्येला प्रारंभ होत आहे . सोमवारी अमावस्या काळात सूर्योदय आला तरच हा सोमवती उत्सव गृहीत धरला जातो व खंडोबा -म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीसह पालखी सोहळा क-हा नदीतीरावरील पापनाश तीर्थाकडे स्नानासाठी मार्गस्थ होत असतो.

मात्र यावेळी अमावस्येचा सूर्योदय मंगळवारी (दि.१७ ) होत असल्याने पालखी सोहळा क-हा स्नानासाठी निघणार नसल्याचे मुख्य मानकरी पेशवे ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोंमणे यांनी सांगितले आहे.

भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर कारवाई करणार

२१ डिसेंबर रोजी भंडाऱ्याचा भडका होऊन १६ जण होरपळले होते तसेच भेसळयुक्त भंडारा विक्रीबाबत व त्यामधून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत वारंवार भाविक व ग्रामस्थ तक्रार करीत असूनही काही विक्रेते रसायन मिश्रित भेसळीचा भंडारा विकत आहेत. पुढील काळात जत्रा यात्रा उत्सवांचा हंगाम असून भेसळीच भंडारा विक्रेत्याच्या विरोधात कठोर व ठोस कायदेशीर उपाययोजना राबविणार असल्याचे जालिंदर खोमणे यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT