मेखळी: विविध खासगी दूध संस्था, कत्तलखाने आणि साखर कारखान्यांकडून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी सोडले जात असल्याने निरा नदीचे प्रदूषण आता धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. शिरवली बंधारा, सांगवी तसेच फलटण तालुक्यातील सोमंथळी बंधारा परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत माशांवर ताव मारण्यासाठी नदीकाठी असंख्य बगळे वावरताना दिसत असून, या प्रकारामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.
निरा नदीत दूषित पाणी सोडल्याने वर्षांतून दोन ते तीन वेळा अशा घटना घडत असतानाही महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित कारखाने व खासगी संस्थांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सातारा जिल्ह्यातून निरा नदीत दूषित पाणी सोडले जात नसल्याचा निर्वाळा सातारा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र, बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याचे दूषित पाणी शिरवली मार्गे खांडज, निरावागज परिसरात जात असून तेच पाणी सोमंथळीकडे उलट दिशेने येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मते, फलटण तालुक्यातील खासगी दूध संस्था व कत्तलखान्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रसायनमिश्रित पाणी थेट ओढ्यामार्फत नदीत सोडले जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव नाराजी
शेतीसाठी पर्यायी पाण्याचा स्रोत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने हेच दूषित पाणी पिकांना द्यावे लागत असून, त्यामुळे उभी पिके जळत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. अद्यापही बारामती व फलटण तालुक्यातील कारखाने व दूध प्रकल्पांकडून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव नाराजी व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांनी ‘प्रदूषणमुक्त’चा शब्द पाळावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य व आरोग्य धोक्यात असून, या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका
उग््रा वास, काळेकुट्ट पाणी आणि रसायनयुक्त मैलामिश्रित पाण्यामुळे शिरवली व सांगवी परिसरातील नदीपात्र पूर्णतः दूषित झाले आहे. सोमंथळी बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शिरवली बंधाऱ्यात पाणी काळे व गडद झाले असून उग््रा वासामुळे तेथे नागरिकांना अधिक वेळ थांबणे अशक्य होत आहे.
पाहणीसाठी मी स्वतः व आमचे अधिकारी घटनास्थळी भेट देतो. तसेच सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.कार्तिक लंगोटे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे
आमच्या हद्दीतून दूषित पाणी सोडले जात नाही. दर महिन्याला नदीकाठी पाहणी केली जाते. तरीही तक्रारीनंतर पुन्हा पाहणी करू. 6 महिन्यांपूर्वी हेरिटेज दूध संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे.अमोल सातपुते, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातारा
फलटण तालुक्यातील दूध संघ, कत्तलखाने आणि माळेगाव कारखान्याच्या प्रदूषित पाण्यामुळे निरा नदीचे पाणी विषारी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळून नदी प्रदूषणमुक्त करावी.मेघश्याम पोंदकुले, शेतकरी, शिरवली (ता. बारामती)