पुणे: नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याच्या अटकेनंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो लंडनमध्येच असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सचिन घायवळला मोबाईल पुरविणाऱ्या मुंबईतील एका सराईताचा सहभाग उघड झाला असून, त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस तसेच रेड कॉर्नर आणि त्यानंतर ब्लू कॉर्नर नोटीस बजावली असतानाच आता नीलेश घायवळ लंडनमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडी- देवनार (मुंबई) परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी सुमित कांबळे याने सचिन घायवळला दोन आयफोन व फेस आयडी काढून दिला. त्या माध्यमातून सचिन घायवळ याने भाऊ नीलेश घायवळ याच्याशी दोन वेळा संपर्क साधला.
दरम्यान, कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल झालेला पहिला गुन्हा आणि त्यानंतर तब्बल दहाहून अधिक गुन्हे कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरोधात दाखल झाले. परंतु, पोलिस नीलेशचा शोध घेत असताना नीलेश मुलाला सोडण्यास लंडनमध्ये गेल्याचे तपासात समोर आले होते. एका प्रकरणात न्यायालयाने पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यास आदेश असताना त्याने नावात बदल करून तो लंडन येथे गेल्याचे तपासातून समोर आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिल्याचे समोर आले. तर त्याने नावात बदल करून पासपोर्ट घेतल्याचे सिद्ध झाले.
नीलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला 'लूक आउट' नोटीस बजाविली होती. त्यानंतर 'रेड कॉर्नर' नोटीस बजाविली. तर यानंतर 'ब्लू कॉर्नर' नोटीसही बजावली आहे. तरीही तो पुणे पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा व्हिसा संपल्यानंतर तो मायदेशी येईल, असा अंदाज पोलिसांना होता. त्यानंतरही पोलिसांच्या हाती आलेला नाही. त्यामुळे नीलेश घायवळ नेमका कुठे आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी आठ महिन्यांपासून फरार असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडे दोन आयफोन व एक साधा फोन मिळाला. तपासात नीलेश याच्याशी सचिन याने फेस आयडीवरून दोन वेळा संपर्क साधल्याचे समोर आले.
दिवसा जागरण, रात्री मचाणावर झोपायचा
सचिन घायवळला पोलिस आपल्याला पकडणार हे माहिती होते. त्यामुळे तो चांगलीच खबरदारी घेत होता. प्रत्येकवेळी तो वास्तव्याचा ठिकाणा बदलत होता. दरम्यान, तो जामखेड, धाराशिव, सोलापूर परिसरात फिरला आहे. सचिन दिवसभर जागरण करायचा, तर रात्री शेतातील मचाणावर झोपायचा.