Sinhgad Fort Pudhari
पुणे

Pune New Year Security: नववर्ष स्वागतासाठी सिंहगड–पानशेत परिसरात कडक बंदोबस्त

गडकोट, धरणे व पर्यटनस्थळांवर नाकाबंदी; मद्यपी तपासणी व बेकायदा पार्ट्यांवर करडी नजर

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: नववर्षाच्या स्वागतासाठी सिंहगड, राजगड, तोरणागड या गडकोटांसह खडकवासला, पानशेत धरण तसेच पर्यटनस्थळांवर प्रशासन सज्ज झाले असून, मुख्य रस्त्यांसह चौकाचौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. बेकायदा पार्ट्या आयोजित करणाऱ्या हॉटेल, फार्महाऊस, ढाबे यांच्यावर करडी नजर राहणार आहे, तर मद्यपी पर्यटकांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे, त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना ताळ्यावर राहण्याची गरज आहे.

31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गडकोट, धरणे तसेच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील म्हणाल्या, सिंहगड, खडकवासला भागात विनापरवाना पार्टी व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या हॉटेल, फार्महाऊस, ढाबे तसेच बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारपासून (दि.30) पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर डोणजे फाटा चौक, सिंहगड पायथा आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. वन विभाग, पोलिस तसेच पुरातत्व खात्याच्या वतीने वतीने सिंहगड, राजगड तोरणागड आदी गडाकोटांवर व गडाच्या पायथ्याच्या सर्व बाजूंच्या पायी मार्गावर पोलिस जवानांसह सुरक्षारक्षकांसह पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांच्या देखरेखीखाली वनरक्षक, वनमजूर, घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समितीचे 34 सुरक्षारक्षक आदींचा बंदोबस्त तैनात केला आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सिंहगडावर जाण्यास प्रतिबंध केला आहे.

राजगड वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, तोरणा, राजगडांच्या पायथ्याला वनरक्षकांची पथके सज्ज केली आहेत. तसेच मढेघाट व इतर वनक्षेत्रांच्या परिसरातही आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. वनक्षेत्रातील जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वनक्षेत्रात बेकायदा पार्ट्या, मनोरंजन कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर वन अधिनियम कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहेत. खडकवासला जलसंपदा विभागाच्या वतीनेही धरण साखळीतील चारही धरणांवरील शाखा अभियंता, सहाय्यक अभियंत्यासह सुरक्षारक्षक, पाहरेकऱ्यांना अलर्ट केले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्या देखरेखीखाली खडकवासल्याच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर फुटाणे, वरसगावच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण, पानशेतचे शाखा अभियंता युवराज दणाणे यांनी धरणाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांचा खडा पहारा सुरू केला आहे.

आज सकाळपासूनच नाकाबंदी

पानशेत, वरसगाव, गुंजवणी या धरणांवर जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वेल्हे पोलीस उद्या बुधवारी (दि.31) सकाळपासून नाकाबंदी करणार आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर तसेच बेकायदा दारूविक्री, पार्ट्या आयोजित करणाऱ्या हॉटेल फार्महाऊस रिसॉर्टवर कारवाई करण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार, जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीची गंभीर समस्या

मुख्य पुणे-पानशेत तसेच सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंहगड पानशेत राजगड परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल फार्महाऊस हाऊसफुल्ल होतात. नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई, मुलाबाळांसह नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मुख्य सिंहगड तसेच पुणे पानशेत, सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडतो. पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT