

पुणे: पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा करत अजित पवार गट 125 जागा, तर शरद पवार गट 40 जागा लढविणार असल्याचे सूत्र निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही पक्षांच्या 165 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवार कोणता, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका जागेसाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी ’एबी’ फॉर्म दाखल केल्याने कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही पक्षांचे मिळून किमान 200 जणांनी अर्ज दाखल केल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाची पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार अनुक्रमे घड्याळ आणि तुतारी या आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत.
पुणे महापालिकेच्या 165 जागांपैकी 125 जागा राष्ट्रवादी काँग््रेास, तर उर्वरित 40 जागा राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार लढणार असे सूत्र ठरले आहे. मात्र, यापेक्षा जास्त इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आघाडीकडून चारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांकडून ‘एबी’ फॉर्म असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यातील कोणते उमेदवार माघार घेणार, यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. इच्छुकांना माघार घ्यायला लावताना पक्षनेत्यांचा कस लागणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता संपणार असून, त्यानंतर अधिकृत कोण, हे स्पष्ट होणार आहे. ‘एबी’ फॉर्म घेण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यालय तसेच नेत्यांच्या घरी इच्छुकांनी सोमवारी रात्रीपासून गर्दी केली होती. अजित पवार गटाने 125 जणांना तसेच राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाने 40 जणांना उमेदवारी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग््रेासकडून सांगण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांच्या पातळीवर मोठा गोंधळ असल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर होते. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने, तसेच अन्य पक्षांतील डावलेल्या इच्छुकांचा पक्षप्रवेश होत असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा अजित पवार यांचा आग््राह होता. मात्र, तसे केल्यास सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग््रेासचे ठरण्याची भीती होती. यावरून बोलणी फिसकटली होती. मात्र, अखेर दोन्ही ’राष्ट्रवादी’ची आघाडी झाली असली तरी एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अधिकृत उमेदवार कोण, याची चर्चा रंगली.