

पुणे: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या बाजारात मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा तिळाच्या पिकाला जबरदस्त फटका बसल्याने यंदा उत्पादनात तब्बल 90 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे बाजारात उच्च दर्जाच्या तिळाचा तुटवडा निर्माण झाला असून, दरात प्रतिकिलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काही महिन्यांतही तिळाचे दर तेजीतच राहण्याची शक्यता व्यापारी व निर्यातदार अजित बोरा यांनी व्यक्त केली आहे.
साधारणपणे खरीप हंगामात देशात पांढऱ्या तिळाचे उत्पादन अडीच लाख टनांच्या आसपास असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा अवकाळी पाऊस, एकरी उत्पादनातील घट आणि अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे 2025 च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी तिळाच्या पेरणीकडे पाठ फिरवली.
याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला असून, यंदाचे उत्पादन केवळ 25 ते 30 हजार टनांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. त्यातही उच्च दर्जाचा माल केवळ 10 टक्के इतकाच उपलब्ध असल्याचे बोरा यांनी सांगितले. दिवाळीपासूनच तिळाच्या दरात वाढ सुरू झाली असून, संक्रांत जवळ येत असताना चांगल्या प्रतिच्या तिळाची कमतरता अधिक तीव झाली आहे.
पुढील उन्हाळी पीक मे-जूनमध्येच बाजारात येणार असल्याने, तोपर्यंत दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात दर्जानुसार तिळाचे दर प्रतिकिलो 120 ते 180 रुपयांदरम्यान होते. मात्र, सध्या घाऊक बाजारात हेच दर 145 ते 210 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील टॅरिफ वाढीचा तिळाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारतातून हलके ते मध्यम दर्जाचे तीळ अमेरिका, युरोप, आखाती देश तसेच पूर्व आशियातील विविध देशांत निर्यात केले जातात. याशिवाय तिळाच्या तेलाचे वाढते महत्त्व लक्षात घेता ऑइल मिल क्रशिंगसाठी लागणाऱ्या तिळाची मागणीही लक्षणीय वाढली आहे.
पांढऱ्या, काळ्या अन् लाल तिळाला मागणी
भारतामध्ये तिळाचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन तीळ बाजारात दाखल होतो. पांढरा, काळा आणि लाल असे तिळाचे प्रकार गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, आंध प्रदेश तसेच काही प्रमाणात महाराष्ट्रात उत्पादित होतात. संक्रांतीसाठी प्रामुख्याने पांढऱ्या तिळाला मागणी असते, तर आयुर्वेदिक उपयोग व विविध पदार्थांसाठी काळा तीळ, आणि धार्मिक पूजेसाठी लाल तीळ वापरला जातो.