पुणे

नवीन पालिका आयुक्त रंगरंगोटीत दंग : लोकांना भेडसावणार्‍या समस्या प्रलंबित

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर नवीन आयुक्तांनी महापालिकेचा कारभार आणि शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचा अभ्यास करणे, त्यासाठी प्रधान्य देणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्त कार्यालयाची रंगरंगोटी व सजावट करण्याचे काम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेत अधिकार्‍यांची बदली होत असते. नवीन अधिकारी आले की ते स्वत:ला हवे तसे कार्यालय करून घेतात. यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले जातात. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांची आपेक्षित वेळेपेक्षा आधीच बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या अधिकार्‍याकडून पुन्हा त्याच कामासाठी खर्च केला जातो, यामुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी होते.

असेच चित्र सध्या महापालिकेत पहायला मिळत आहे. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त व इतर अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. महापालिकेचे नवीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी रुजू झाल्यानंतर काही दिवसांत आपल्या कार्यालयाची रंगरंगोटी व सजावटीचे काम काढले आहे. कार्यालयाचा रंग आणि फर्निचर चांगले आणि सुस्थितीत असताना देखील हे काम हाती घेतली आहेत. याशिवाय महापालिकेच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावही फर्निचरची कामे केली जात आहेत. त्यामुळे पालिकेत नागरिकांच्या कामांपेक्षा अधिकार्‍यांची दालने सजविण्यावरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या कररुपी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

महापालिकेत दर दोन ते तीन वर्षांनी रंगरंगोटी आणि फर्निचर बदलण्यात येते. सर्व काही चांगले असताना देखील असे का केले जात आहे, असा प्रश्न पडतो. केवळ जनतेचा पैसा आहे म्हणून महापालिका असा खर्च करते. जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरला पाहिजे. हे पूर्णपणे चुकीचे काम सुरू आहे.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष- सजग नागरिक मंच

'फर्निचरचा खर्च काढला नाही'

महापालिकेतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा खर्च किती येतो, हे पाहून निधीची तरतूद केली जाते. मात्र, आयुक्त कार्यालयाच्या सुशोभीकरणसाठी किती खर्च येणार आहे, हे अद्याप काढण्यात आलेले नाही. रंगरंगोटीला चार ते पाच लाख रुपये खर्च येइल, फर्निचरसाठी किती खर्च येईल, हे अद्याप काढले नसल्याची माहिती पुणे महापालिकेच्या भवन विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT