झाडातून बाहेर आला पाण्याचा फवारा!

झाडातून बाहेर आला पाण्याचा फवारा!

हैदराबाद : निसर्गाची अनेक थक्क करणारी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. अनेक आवरणे असलेल्या नारळामध्ये असलेले गोड पाणी, जमिनीतून बाहेर येणारा पाण्याचा उमाळा माणसाला थक्क करतात. काही झाडांमध्येही पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता असते. आता आंध्र प्रदेशात अशाच एका झाडावर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी संशोधनासाठी कोयत्याने वार केला असता त्यामधून पाण्याचा फवारा बाहेर आला. या झाडाला इंग्रजीत 'इंडियन लॉरेल' असे म्हणतात. मराठीत त्याला 'ऐनाचे झाड' म्हटले जाते.

आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी या झाडाच्या सालीवर ही कुर्‍हाड मारली आणि त्यामधून पाणी वाहू लागले. या झाडामधून इतक्या वेगाने पाणी वाहत होते की, जणू काही आत पाण्याची टाकीच भरलेली आहे! या घटनेचा व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे. उन्हाळ्यात हे झाड पाणी कसे जमा करते हे पाहण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी झाडाच्या सालीवर कोयत्याने वार केला.

एखाद्या शहाळ्यावर कोयता मारून पाणी पिण्यासाठी दिले जाते, तशाच पद्धतीने या झाडावर कोयत्याने घाव केल्यावर पाणी बाहेर आले! पापिकोंडा राष्ट्रीय उद्यानात हे झाड आहे. वन विभागाला या झाडाबाबतची माहिती स्थानिक कोंडा रेड्डी समुदायातील लोकांनी दिली होती. हा समुदाय गोदावरीच्या परिसरातील पापिकोंडा डोंगरात राहतो आणि त्यांना तेथील झाडाझुडपांची परंपरेने बरीच माहिती आहे. या झाडाचे वैज्ञानिक नाव 'फिकस मायक्रोकार्पा' असे आहे. हे एक उष्णकटिबंधीय झाड असू, ते आशियाच्या अनेक भागांमध्ये तसेच ऑस्ट्रेलियातही आढळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news