लंडन : कधी कधी अपघातही कल्पनेच्या पलीकडचेच असतात. बर्याच वेळा नको ते साहस करीत असताना किंवा अतिउत्साहीपणामुळेही असे अपघात घडतात. आता सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक एसयूव्ही कार हवेत चारवेळा उलटताना दिसते; पण कारचा चालक आश्चर्यकारक बचावला जातो. अपघाताचा हा व्हिडीओ कुवैतमधला आहे. कुवैतमधल्या अल-कबीर गवर्नरेटमध्ये ही घटना घडली. चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटते. हा अपघात इतका भीषण होता की, चालक कारच्या बाहेर अनेक फूट उंच फेकला जातो.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ अबू अल हसनिया समुद्रकिनार्यावरचा आहे. व्हिडीओत एक एसयूव्ही कार समुद्रकिनारी वेगाने येताना दिसतेय; पण पाण्याचा वेग वाढल्याने चालक, कार किनार्याच्या आणखी बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो; पण यात चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटते आणि एका क्षणात कार उलटते. एक-दोनवेळा नाही तर कार तब्बल चारवेळा उलटते; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कारमधील चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला जातो. कार उलटत असताना चालक उंच हवेत फेकला जातो आणि समुद्रात पडतो.
चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. एका हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळालेत. अनेक लोकांनी कमेंटस्ही केल्या आहेत. या व्हिडीओवर एका यूझरने कमेंट केली आहे की, चालकाने सेफ्टी बेल्टचा वापर न केल्याने तो बाहेर फेकला गेला असावा, तर एका यूझरने म्हटलेय, हा चालक आता वर्षातून दोनवेळा आपला जन्मदिवस साजरा करेल! एका यूझरने समुद्रकिनार्यावर स्टंट करणे चांगलेच महागात पडल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.