नवीन नाटकांच्या प्रयोगांनी बहरणार प्रायोगिक रंगभूमी Pudhari
पुणे

Experimental Plays Pune: नवीन नाटकांच्या प्रयोगांनी बहरणार प्रायोगिक रंगभूमी

अनेक संस्थांकडून होतेय निर्मिती : नोव्हेंबर ते जानेवारी सीझनमध्ये पाहता येणार नवीन नाटके

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे : कुठे संहिता लेखनाचे काम, तर कुठे सुरू असलेला नवीन नाटकाचा सराव... कुठे नाट्यगृहाच्या बुकिंगसाठीची धडपड, तर कुठे राज्यभरातील नाटकाच्या दौऱ्यांसाठीचे सुरू असलेले नियोजन... सध्या प्रायोगिक रंगभूमीवर नवीन नाटकासाठीची तयारी सुरू असून, नोव्हेंबर ते जानेवारी या काळात अनेक नवीन नाटकांच्या प्रयोगांनी रंगभूमी बहरणार आहे.(Latest Pune News)

अनेक नाट्यसंस्थांकडून त्याबाबतची तयारी पूर्ण झाली असून, खासगी नाट्यगृहांमध्ये बुक झालेल्या तारखांमध्ये प्रामुख्याने प्रायोगिक नाटकांसाठीच्या तारखांची संख्या जास्त आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा सीझन व्यावसायिक रंगभूमीसाठीचा असे म्हटले जाते. पण, यंदा अनेक नाट्यसंस्था रंगभूमीवर प्रायोगिक नाटक आणण्यासाठी सज्ज आहेत. पुण्यात व्यावसायिक नाटकांच्या जोडीला आता प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढली आहे.

नोव्हेंबर ते मार्च हा व्यावसायिक नाटकांसाठीचा काळ असला तरी काही प्रायोगिक रंगभूमीवरही काही नवीन नाटकांची निर्मिती करण्यात येत असून, त्यासाठीची नाट्य संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे. रंगभूमीवर जुन्या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होत आहेतच. पण, नवीन नाटकांचे प्रयोग खासकरून नोव्हेंबर ते जानेवारी याकाळात पाहायला मिळणार आहेत. नाटकांमधील विषय, मांडणी यात वेगळेपण जपण्यावर भर देण्यात येत असून, काही नाट्य संस्थांकडून राज्यभरात नाटकांच्या दौऱ्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.

पुण्यात अंदाजे 20 ते 25 नाट्य संस्थांकडून नाट्यनिर्मिती

प्रायोगिक नाटकांची चळवळ आता मुंबई, पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता विविध जिल्ह्यांमध्येही प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे नाटकांच्या निर्मितीचेही प्रमाण वाढले आहे. विविध ठिकाणच्या नाट्यमहोत्सवांमध्ये नाटकांचे प्रयोग होत असून, पुण्यामध्ये अंदाजे 20 ते 25 नाट्य संस्था प्रायोगिक नाटकांची निर्मिती करत आहेत. विविध विषयांवर आधारित असलेली, विचार करायला लावणारी, वेगळी मांडणी असलेली आणि तरुण कलाकारांच्या कलाकारीने रंगलेल्या प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचावा, या उद्देशाने नाट्य संस्था ठिकठिकाणी प्रयोग करीत आहेत.

पुण्यात प्रायोगिक रंगभूमीचे प्राबल्य अधिक आहे. पुण्यामध्ये प्रायोगिक नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होत असून, विविध नाट्य संस्थांकडून नवीन प्रायोगिक नाटकांची निर्मिती होत आहे. आमच्या संस्थेतर्फे धनंजय सरदेशपांडे लिखित नाटक डिसेंबरमध्ये रंगभूमीवर येईल. नाटकात एकूण 12 कलाकार असतील. मी नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. भावना दुखावल्याबद्दल खुपसा गावातील एक माणूस आत्माहुती जाहीर करतो, त्यातून घडणारे धम्माल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
राहुल लामखडे, कलाकार आणि दिग्दर्शक, प्रायोगिक रंगभूमी
नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान नवीन नाटकांचा आनंद प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी नवीन नाटक रंगभूमीवर आणले जाते. पुण्यामध्ये रंगभूमीसाठी चांगले वातावरण, नाट्यगृहे आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन नाटकांचे प्रयोग प्रायोगिक रंगभूमीवर येणार आहेत. आम्हीही दोन नवीन नाटकांची निर्मिती केली आहे. नाटक नोव्हेंबर महिन्यात रंगभूमीवर येणार आहे. ‌‘शॉर्ट कट लाँग कट‌’ हे लेखक शार्दुल निंबाळकर यांनी लिहिलेले नाटक आणि ‌‘खांजोट्याचा मारुती‌’ हे व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेवर आधारित नाटक आम्ही रंगभूमीवर आणत आहोत.
धनंजय सरदेशपांडे, प्रायोगिक रंगभूमीवरील लेखक-अभिनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT