महेंद्र कांबळे
पुणे: देशातील नीट परीक्षा पेपरफुटीच्या केंद्रस्थानी सध्या पुणे शहराचे नाव चर्चेत आहे. ‘शिक्षणाचे माहेरघर’ अशी बिरुदावली असलेल्या पुण्याची प्रतिमा पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यांमुळे चांगलीच मलीन झाली आहे. आरोग्य विभागातील भरती, म्हाडा भरती, शिक्षकांची पात्रता परीक्षा (टीईटी) त्यापाठोपाठ आता राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (‘नीट- यूजी’ 2026) पेपरफुटी प्रकरणातही पुणे कनेक्शन ठळकपणे समोर आले आहे. त्यामुळे पुणे हे ‘महाघोटाळ्यांचे’ केंद्र बनले असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, प्रत्येक मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे पुण्याशीच कसे जोडले जातात, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
देशभर चर्चेत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र प्राध्यापक मनीषा मांढरे यांच्यासह मनीषा वाघमारे या ब्युटी पार्लरचालक एजंट महिलेला अटक केली आहे. या तिघांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) तज्ज्ञ मंडळातील काही व्यक्तींशी संगनमत करून विद्यार्थी, त्यांचे पालक व विविध शहरांतील क्लासचालकांना या प्रश्नपत्रिका विक्री करून मोठी आर्थिक उलाढाल केल्याचे तपासात समोर आले आहे.
लातूर येथील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचा (आरसीसी) संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर यालाही पुण्यात बेड्या ठोकून सीबीआय कोठडीत टाकले आहे. लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, पुण्यासह आठ-नऊ शहरांत असलेल्या शाखांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये त्याने नीट-यूजी 2026 हे पेपर सर्क्युलेट केले असल्याचा सीबीआय अधिकाऱ्यांना संशय आहे.
मोटेगावकर पाठोपाठ इतरही अनेक क्लासचालकांचा मागोवा सीबीआय अधिकारी घेत असून, या पेपरफुटीची पाळेमुळे कुठंपर्यंत आणि आणखी कोणापर्यंत पोहोचताहेत, याबद्दल शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संयुक्त संचालक महेश बोटले यांच्यासह अनेक अधिकारी आणि मध्यस्थांना 2021 मध्ये अटक झाली होती. त्यानंतर म्हाडा भरती घोटाळ्यात जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख आणि त्याच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला. टीईटी घोटाळ्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह अनेक एजंट आणि संबंधित व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
या सर्व घोटाळ्यांमधील समान धागे आता समोर येत आहेत. सरकारी यंत्रणांतील काही अधिकारी, खासगी परीक्षा कंपन्या, शिकवणी वर्ग, माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती आणि मध्यस्थ यांचे संगनमत असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. प्रत्येक वेळी यावर निर्बंध घालण्याबाबतच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, चौकशी समित्या आणि अटकसत्रे सुरू होतात. मात्र, काही महिन्यांतच नवा घोटाळा, नवे प्रकरण समोर येते आणि जुनी प्रकरणे, त्यांच्या फायली धूळ खात पडतात. त्यामुळे ही रॅकेटस प्रशासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय नेत्यांनाही मॅनेज करताहेत, अशा शंका व्यक्त करणाऱ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याप्रकरणी केवळ चौकशी नको तर जलद शिक्षाही व्हावी, अशी मागणीही जोर धरत आहे.