Doctor Pudhari
पुणे

NEET SS 2026 Registration: डॉक्टरांसाठी सुपर स्पेशालिटीची संधी! नीट एसएस २०२६ नोंदणी सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

डीएम, एमसीएच आणि डॉ. एनबी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा; ११ आणि १२ डिसेंबरला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस अर्थात एनबीईएमएसने नीट सुपर स्पेशालिटी २०२६ ची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. देशभरातील हजारो डॉक्टर आता सुपर स्पेशालिटी कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

एमडी, एमएस किंवा डीएनबी पूर्ण केलेल्या डॉक्टरांसाठी डीएम, एमसीएच आणि डॉ. एनबी सारख्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. सामान्य वैद्यकीय शिक्षणानंतर विशिष्ट अवयव किंवा आजारात प्रावीण्य मिळवण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतो. पात्रतेसाठी संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असणे अनिवार्य आहे.

पीजी कोर्स १८ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी पूर्ण झालेला असावा. तसेच, नॅशनल मेडिकल कमिशन किंवा राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी असणे आवश्यक आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते आणि तिच्या माध्यमातून १५६ पेक्षा जास्त वैद्यकीय संस्थांमध्ये २४०० हून अधिक सुपर स्पेशालिटी जागांसाठी काउन्सिलिंग होते. सामान्य सर्जनमधून न्यूरोसर्जन किंवा फिजिशियनमधून कार्डिओलॉजिस्ट बनण्यासाठी नीट एसएस उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

शैक्षणिक अटी पूर्ण करणारे कोणत्याही वयाचे डॉक्टर परीक्षा देऊ शकतात. वैद्यकीय क्षेत्रात करिअरचा मोठा टर्निंग पॉइंट ठरणारी ही परीक्षा डॉक्टरांना विशेष कौशल्ये आत्मसात करण्याची संधी देते. हजारो पदवीधर डॉक्टर दरवर्षी या परीक्षेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवतात. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमित तपासणी करावी आणि वेळेवर अर्ज पूर्ण करावा, असे देखील स्पष्ट केले आहे.

असे राहणार परीक्षेचे स्वरूप

परीक्षा ११ आणि १२ डिसेंबरला कॉम्प्युटर आधारित पद्धतीने होईल. एकूण १५० बहुपर्यायी प्रश्न असतील आणि त्यांना सोडवण्यासाठी अडीच तास मिळतील. प्रश्नपत्रिका तीन भागांत विभागली जाईल आणि प्रत्येक भागासाठी ५० मिनिटे निश्चित वेळ असेल. बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कपात होईल. पात्र होण्यासाठी किमान ५० पर्सेंटाइल गुण आवश्यक आहेत. त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी उमेदवार पात्र ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT