बारामती : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्र लढविण्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये संभमाचे वातावरण आहे. एकत्र लढण्यास शरद पवार गटाची तयारी असली तरी अजित पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते शनिवारी (दि. 17) बारामतीत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी एकत्र आले होते. पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे अजित पवार यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सांगत थेट उत्तर देणे टाळत सावध पवित्रा घेतला.
अजित पवार हे गोविंदबागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले त्यावेळी खा. सुप्रिया सुळे ही तेथे होत्या. लगोलग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्क्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हेही तिथे पोहोचले. या सर्वांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली.
बैठकीतून बाहेर आल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रितपणे लढतील, जिथे तुल्यबळ उमेदवार दोन्ही बाजूंनी असतील तेथे मैत्रिपूर्ण लढती होतील असे स्पष्ट केले. जयंत पाटील, खा. कोल्हे यांनीही हीच भूमिका जाहीर केली,तर प्रदेशाध्यक्षांनी चर्चेसंबंधी माध्यमांना माहिती दिलीच आहे, त्यावर मी वेगळे काय बोलू, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पत्रकार परिषदेत यासंबंधीच्या प्रश्नावर अत्यंत सावध भूमिका घेतली. प्रथम त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी अशी बैठक झाल्याचेच नाकारले,ते म्हणाले, ‘कृषिक’ प्रदर्शनाच्या
उद्घाटनासाठी सर्व मंडळी गोविंदबागेत असल्याने तेथून शरद पवार यांच्यासह एकत्रितच जायचे म्हणून मी तेथे गेलो. अशी कोणतीही बैठक तिथे झाली नाही. स्थानिक पातळीवरील निवडणुकांचा अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. हे पदाधिकारी त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतील. आम्ही परिवार म्हणून सुख-दुःखात एकत्र आहोतच; परंतु आता आम्ही महायुती म्हणून केंद्र-राज्यात एकत्र आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट करत अत्यंत सावध भूमिका घेतली.
अटल इन्क्युबेशन सेंटर येथे अजित पवार व सुप्रिया सुळे यांची 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेसंबंधी खा. सुळे माध्यमांना म्हणाल्या, मनोमिलनावर तुमचीच चर्चा सुरू आहे. बंद दाराआडची चर्चा बाहेर येते का? जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्यावर चर्चा झाली आहे.