NCP Alliance Maharashtra (File Photo)
पुणे

NCP Alliance Maharashtra: राज्यात 'दोन्ही राष्ट्रवादी' काँग्रेसची आघाडी निश्चित! १२ डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवशी अधिकृत घोषणा?

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा पुढाकार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी तयारी; 'घड्याळ' की 'तुतारी' चिन्हावर लढणार?

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या वाढदिवसाचे (दि. 12) औचित्य साधून या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा नवी राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत.

केंद्रात आणि राज्यात महायुतीत एकत्र असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत अपवाद वगळता स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकीत हीच परिस्थिती कायम राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने भाजपचा सामना करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या चर्चेतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत जवळपास निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले. याबाबतची अधिकृत घोषणा पवारांच्या वाढदिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला होईल, असे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. पुणे शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास थेट पक्षाचा राजीनामा देऊ, असे जाहीर केले आहे. त्यांचीही मनधरणी करण्यात येत असल्याचे समजते.

चिन्ह नक्की कोणाचे?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ की पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणुका लढणार याबाबत संभम आहे. मात्र, सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळावरच निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीचे काय?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार? असाही प्रश्न उपस्थित होणार आहे. प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आता अत्यल्प आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी समवेत हे दोन्ही पक्ष एकत्रही येऊ शकतात असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT