Sharad Pawar Pudhari
पुणे

NCP Merger Controversy: विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री कुठेच नव्हते; भाष्य करण्याचा अधिकार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी विलिनीकरणावरून देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा स्पष्ट टोला

पुढारी वृत्तसेवा

बारामती: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकऱणाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी टोला लगावला. त्यांना माझ्याबाबतचा उल्लेख रण्याचा काय अधिकार आहे हे समजले नाही. कारण विलिनीकरणाच्या चर्चेत ते कुठेच नव्हते, या शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

बारामतीत पवार हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. असे काही असते तर अजितदादांनी मला कल्पना दिली असती. तसेच विलीनीकरणाचा मुद्दा होता तर शरद पवार हे एनडीए सोबत येणार होते का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. तसेच ही चर्चा अजित पवार व जयंत पाटील यांच्यात सुरु होती. ती पूर्णपण गैर राजकीय स्वरुपाची होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे आम्हा लोकांसमोर जे संकट आहे, त्यातून परस्परांना धीर देणे आणि पढे कसे जायचे यावर आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाशी संबंधित आंम्ही कोणाशी चर्चा करत नाही.

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचा उल्लेख विरोधी पक्षाकडून देशाच्या संसदेत होत असेल तर राहूल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची संधी देणे आवश्यक होते. संसदीय परंपरेनुसार चर्चेला उत्तर देण्याचा अधिकारी दिला गेला पाहिजे, राहुल गांधी यांच्यावर कोणताही दबाव होता की नाही, याबाबत आपल्याकडे ठोस माहिती नाही असे सांगून पवार यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीचा उल्लेख केला. ते म्हणाले, गेल्या ५८ वर्षात महाराष्ट्र विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत मी कधीही गैरहजर राहिलेलो नाही. मात्र अलिकडे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अंदाजपत्रक सत्राला उपस्थित राहता आलेल नाही. तरीही या काळात काही समाधानकारक निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीबाबतही आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बारामतीत अजितदादांचे स्मारकाबाबत मला माहिती नाही, याबाबत मी वृत्तपत्रात बातमी वाटली. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे, अद्याप त्याबाबत आम्ही चर्चा केलेली नाही. आम्ही संस्थेचे सर्व लोक एकत्र बसून त्यावर चर्चा करू, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल व्यक्त होत असलेल्या शंकांबाबत ते म्हणाले, मी त्यावर घटनेदिवशी बोललो आहे. जोपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही. तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही.

भारत–अमेरिका संबंधांवर भाष्य करताना पवार म्हणाले की, अमेरिकेने काही टेरिफ कपात केल्याचे वृत्त आहे. येत्या दोन दिवसांत भारत आणि अमेरिकेतील व्यापाराबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निर्यातीस संधी असली तरी अमेरिका जर मोठ्या प्रमाणावर निर्यात करू लागली, तर त्याचा भारतीय शेतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याचा आनंद असल्याची भावना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. राजकीय आयुष्यात संधी मिळणे ही सकारात्मक बाब असून त्याकडे समाधानाने पाहतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना सोशल मिडियावर ट्रोल केले जात असल्याच्या प्रश्नावर याबाबत मला माहिती नाही, असे उत्तर पवार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT