

पुणे: केंद्र सरकारने राज्याला यंदाच्या रब्बी हंगामासाठी 31 लाख 35 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर केला असून त्यानुसार सुरळित खतपुरवठा सुरु आहे. मंजूर पुरवठ्यातील दोन महिन्यांचा खत पुरवठाही होणे बाकी असून खतांची मुबलकता असल्याची माहिती कृषी विभागाचे संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेची कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील तीन वर्षे म्हणजे हंगाम 2022-23 मध्ये 27.04 लाख मे.टन, 2023-24 मध्ये 20.01 लाख मे.टन आणि 2024-25 मध्ये 28.20 लाख मेट्रिक टनाइतक्या खतांचा प्रत्यक्ष वापर झाला होता. तर मागील या तीनही वर्षातील खतांचा सरासरी वापर 25 लाख 8 हजार मेट्रिक टनाइतका राहिला आहे. याचा विचार यंदाच्या 2025-26 मध्ये मंजूर झालेला कोटा सर्वाधिक आहे.
रब्बी हंगाम दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु झाला. त्यावेळी राज्यात प्रत्यक्षात निविष्ठा विक्रेत्यांकडे 15 लाख 74 हजार मेट्रिक टनांइतकी खतांची उपलब्धता होती. मंजूर झालेला खत पुरवठा 31 लाख 35 हजार मेट्रिक टन आहे.
म्हणजेच रब्बी हंगामासाठी एकूण उपलब्धता 47 लाख 9 हजार मेट्रिक टनाइतकी मुबलक अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आत्तापर्यंत या उपलब्धतेतून खतांची प्रत्यक्षात विक्री 21 लाख 5 हजार मेट्रिक टनाइतकी झाली आहे.
तसेच सद्य:स्थितीत आजअखेर 19 लाख 16 हजार मे.टनाइतकी खतांची प्रत्यक्ष उपलब्धता आहे. तसेच फेबुवारी आणि मार्च महिन्यात मंजूर कोट्यापैकी आणखी 7.50 लाख मे.टन खतांचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. याचा विचार करता खतांची मुबलक उपलब्धता असल्याचेही किरनळ्ळी यांनी सांगितले.