Alaknanda Spiral Galaxy Discovery Pudhari
पुणे

Alaknanda Spiral Galaxy Discovery: १२ अब्ज प्रकाशवर्षे दूरच्या 'अलकनंदा'चा शोध! विश्वाच्या बालपणातील भव्य सर्पिल आकाशगंगा शोधण्यात पुणेरी शास्त्रज्ञांना यश

NCERA च्या राशी जैन व प्रा. वाडदेकर यांचे दुर्मीळ संशोधन; जेम्स वेब टेलिस्कोपचा वापर, ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग आकाशगंगेपेक्षा २० ते ३० पट जास्त.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आपल्या आकाशगंगेपासून तब्बल 12 अब्ज प्रकाशवर्षे दूर असणारी एक नवी सर्पिलाकृती आकाशगंगा शोधण्यात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीईआरए) संशोधकांना मोठे यश आले आहे. तरुण शास्त्रज्ञ राशी जैन व प्रा. योगेश वाडदेकर यांनी हे दुर्मीळ संशोधन केले आहे.

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोप ( जे.डल्ब्यू.एस.टी.) चा वापर करून पुण्यातील शास्त्रज्ञांनी आजवरच्या सर्वात दूर असणाऱ्या सर्पिल आकाशगंगापैकी ही एक नवी आकाशगंगा शोधली आहे. विश्वाचे वय 1.5 अब्ज वर्षे असताना ती अस्तित्वात होती. हिमालयातील नदीच्या नावावरून तिला अलकनंदा हे नाव शास्त्रज्ञांनी दिले. पुण्यातील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) च्या रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीईआरए) संशोधक राशी जैन आणि प्रा. योगेश वाडदेकर यांनी हा शोध लावला आहे.

अलकनंदा ही अशी आकाशगंगा (दीर्घिका) आहे जी आपल्याच आकाशगंगेसारखी दिसते. पण ती विश्वाच्या सध्याच्या केवळ 10 टक्के असताना उपस्थित होती. हे संशोधन युरोपियन जर्नल ॲस्ट्रोनॉमी ॲन्ड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित झाले आहे.

एनसीईआरए संस्थेतील तरुण शास्त्रज्ञ राशी जैन, प्रा. योगेश वाडदेकर यांचे मोठे संशोधन

महत्त्वाची निरीक्षणे...

बिग बँग थेअरी अर्थात महास्फोटानंतर केवळ 1.5 अब्ज वर्षांनी ती होती तशीच दिसली. मात्र, ती आपल्यापर्यंत येणाऱ्या 12 अब्ज प्रकाश वर्षे लागली. मात्र, तिचे आताचे अस्तित्व स्पष्ट करणे कठीण आहे.

प्रचंड वस्तुमानाची, वेगाने तारेनिर्मिती करणारी आणि परिपूर्ण रचना असलेली आकाशगंगा.

अलकनंदा ही आपल्या आकाशगंगेप्रमाणे दोन सर्पिलभुजा असणारी आहे.

या दीर्घिकेने 600 दशलक्ष वर्षाच्या कालावधीत तिचे सर्व तारे तयार केले.

तिचे वस्तुमान आपल्या आकाशगंगापेक्षा जास्त असून, आकाराने लहान आहे. मात्र, ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग 20 ते 30 पट जास्त आहे.

अलकनंदा ही वेगळीच कथा सांगते, या आकाशगंगेला केवळ काहीसे दशलक्ष वर्षात 10 अब्ज सौर वस्तुमानांचे तारे एकत्र करावे लागले आणि सर्पिल भुजांसह एक मोठी चकती करावी लागली ही अतिशय जलदकृती आहे.
प्रा. योगेश वाडदेकर, ज्येष्ठ प्राध्यापक, एनसीईआरए, पुणे
मूळची राजस्थान येथील भरतपूरची असून, पुण्यात पाच वर्षापासून संशोधन करीत आहे. यात माझे गुरू प्रा.योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे. यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. सुमारे 2 हजार 700 आकाशगंगाचा अभ्यास वारंवार केल्यावर अलकनंदा आकाशगंगाचा शोध लागला.
राशी जैन, संशोधक, एनसीईआरए, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT