पुणे: नवले पूल परिसरात आता कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा रास्ता रोको करता येणार नाही. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. अलीकडेच नसरापूर येथील घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी नवले पूल परिसरात आंदोलन केले होते.
या आंदोलनामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि हजारो वाहनचालकांना चार तासांहून अधिक काळ अडकून पडावे लागले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला तसेच आंदोलन रस्त्यावरून हटवण्याचे आवाहनही केले.
मात्र, बराच वेळ रस्ता बंदच राहिल्याने रुग्ण, नोकरदार, प्रवासी आणि इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती.
पोलिस प्रशासनाच्या मते, नवले पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने आधीपासूनच अतिसंवेदनशील भाग आहे. येथे थोड्याशा अडथळ्यामुळेही लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात आणि त्याचा परिणाम शहरातील इतर भागांवरही होतो. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन हा आदेश लागू करण्यात आला आहे. यापुढे नवले पूल परिसरात आंदोलन, रास्ता रोको किंवा वाहतूक खोळंबा करणाऱ्या कोणत्याही कृतीवर कडक कारवाई केली जाणार आहे.