Navale Bridge  Pudhari
पुणे

Navale Bridge Ambulance Lane: नवले पुलावर वेगमर्यादा लागू; मात्र रुग्णवाहिकांसाठी कोंडी जीवघेणी

अपघात कमी झाले, पण ट्रॅफिक जाममुळे ‘गोल्डन अवर’ धोक्यात; स्वतंत्र आपत्कालीन लेनची मागणी

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: नवले पुलाजवळील अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून येथील वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा 40 किमी ठेवली आहे. त्यामुळे भीषण अपघाताचे प्रमाण कमी होत असले, तरी तीव्र उतार परिसरात कोंडीजन्य स्थिती निर्माण होत आहे. परिणामी, आपत्कालीन सेवेला मोठा अडथळा ठरत आहे. यामुळे रुग्णवाहिकांना पुढे जाण्यासाठी जागाच उरत नाही.

वैद्यकीय शास्त्रात अपघाताच्या पहिल्या तासाला म्हणजेच ‌‘गोल्डन अवर‌’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, या तीव उतारावर अडकलेल्या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही काळापासून अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पुलावर पुणे प्रशासनाने उपाययोजनांचा धडाका लावला आहे. 40 किमी प्रतितास वेगमर्यादेमुळे अपघातांना काहीसा लगाम बसला असला तरी, प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती मात्र रुग्णवाहिका आणि गंभीर रुग्णांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सोमवारी मध्यरात्री (दि. 22) दै. ‌‘पुढारी‌’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत सुरक्षेचे नवे नियम आणि त्यातून उद्भवणारी रुग्णवाहिकांची स्थिती, अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत.

रुग्णाला ‌‘गोल्डन अवर‌’मध्ये पोहचवणे आवश्यक असते, तसेच अपघातग््रास्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी वेळेत पोहचणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेसह अग्निशमन दल, पोलिस यांसह अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी या ठिकाणी ‌‘इमर्जन्सी वे‌’ (आपत्कालीन रस्ता) असायला हवा.
प्रियंका जावळे, विभागीय प्रतिनिधी, 108 महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, पुणे विभाग

वेगमर्यादा नियम माहीत नसलेले चालक सुसाट

नवले पुलाच्या तीव उतारावर जड वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेले रॅम्बलर पट्टे आणि 40 ची वेगमर्यादा यामुळे ट्रक व टेम्पोचा वेग लक्षणीय घटला आहे. स्थानिक आणि रोज प्रवास करणाऱ्या चालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे. मात्र, या मार्गावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या नवीन चारचाकी चालकांना अद्यापही उताराचा अंदाज येत नसल्याने ते धोकादायक वेगाने वाहने चालवताना दिसत आहेत.

नवले पुलाच्या उतारावर गाडीचा वेग 40 वर ठेवल्याने अपघात कमी होतील, हे मान्य आहे. पण जेव्हा समोर ट्रॅफिक जाम असते, तेव्हा आम्हाला रुग्णवाहिका काढायला जागा उरत नाही. सायरन वाजवूनही पुढे वाहने सरकायला मार्ग नसतो. गंभीर रुग्णाला घेऊन जाताना प्रत्येक सेकंद आमच्यासाठी युद्धासारखा असतो. प्रशासनाने येथे आपत्कालीन मार्गिका ठेवली पाहिजे.
तुषार येणपुरे, रुग्णवाहिका चालक

पाहणीतून काय आले समोर

या पाहणीतून एकच समोर आले आहे, की या तीव उताराच्या परिसरातील रस्त्यावर रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन आवश्यक आहे. जर या तीव उताराच्या परिसरातील रस्त्यावर एका बाजूने रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून दिली, तर वेगमर्यादेचा उद्देश यशस्वी होऊ शकतो आणि सुरक्षिततेसोबतच रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या गंभीर रुग्णांचा प्राणही वाचवता येईल.

प्रशासनाने सुरक्षा उपाय केले, हे चांगलेच आहे. पण, त्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम रुग्णवाहिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. येथे रुग्णवाहिकेसाठी वेगळी लेन असणे आता आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांसाठी प्रशासनाने या भागात स्वतंत्र लेन करावी.
दिनेश शिंदे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT