नसरापूर: हॉटेलमालकाने नवीन मोबाईल विकत घेऊन न दिल्याच्या कारणावरून चिडून जाऊन हॉटेलमालकाच्या सासऱ्याचे परप्रांतीय हॉटेल कामगाराने मध्यरात्री बोथट हत्याराच्या साह्याने ठेचून खून केला. खुनाची घटना बुधवारी (दि. 25) दुपारी उघडकीस आली आहे. आरोपीला पुण्यातून पकडण्यात आले आहे. वास्तविक, हॉटेलमालकालाच संपविण्याचा कट त्याने रचला होता, असे समजते.
किसन बापू सुर्वे (वय 75, रा. भोंगवली, ता. भोर) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून, ही घटना नसरापूर वेल्हे मार्गावरील एका हॉटेलमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. सागर थापा (वय 21) असे खून करणाऱ्या परप्रांतीय हॉटेल कामगाराचे नाव आहे. घटनास्थळी राजगड पोलिसांनी धाव घेऊन फॉरेन्सिक पथक, श्वानपथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल रसाळ यांच्या हॉटेलशेजारी त्यांचे सासरे किसन सुर्वे यांची पानटपरी असून, आरोपी सागर थापा हा हॉटेलमध्ये 15 दिवसांपासून तंदूरभट्टीवर रोटी थापण्याच्या कामासाठी होता. मंगळवारी (दि. 24) हॉटेलमालक रसाळ यांच्याकडे थापाने मोबाईल विकत घेऊन देण्याचा अट्टहास केला होता. रसाळ यांनी आता पैसे नाही, नंतर मोबाईल घेऊन देतो, असे सांगितले होते.
मंगळवारी रात्री हॉटेल बंद करून सर्व झोपण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे किचनमध्ये किसन सुर्वे झोपले होते. दुसऱ्या दिवशी सागर थापा व किसन सुर्वे दोघेही आढळून आले नाहीत. सुर्वे यांचा शोधाशोध केला असता सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास किचनच्या कोपऱ्यामध्ये मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला.
प्रसंगावधानाने आरोपीला अटक
घटनेनंतर आरोपी सागर थापा याने गावाकडे पळून जाण्यासाठी रिक्षाने रेल्वे स्टेशन गाठले; मात्र, रिक्षाभाड्याचे पैसे देण्यासाठी नसल्याने सागरने हॉटेलमालकाचा मुलगा आकाशला रिक्षाचालकाच्या फोनवरून गुगल-पेने 500 रुपये मागितले. या वेळी आकाशने प्रसंगावधान ओळखून रिक्षाचालकाकडे फोन देण्याचे सांगून रिक्षाचालकाला घडलेल्या घटनेची माहिती देत सागरला थांबवून ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार राजगड पोलिसांनी त्याला जेरबंद केले.