

कसबा पेठ: पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मेट्रो स्टेशनच्या खालील रस्त्यावर अनेक जण चारचाकी, दुचाकी, रिक्षा, टेम्पो थेट रस्त्यावर लावून जातात तर काही जण चक्क चारचाकी लावून बिनधास्तपणे तासन् तास थांबलेले दिसतात. त्यामुळे पुण्यात नवीन वाहनतळ निर्माण झाले की काय? असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्यांना पडत असून, महापालिका प्रशासनचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील अगदी पुणे महानगरपालिकेसमोर असलेल्या बसथांब्यावर असंख्य बसथांबे आहेत. या बसथांब्यांवरून दररोज शहर, उपनगर आणि पिंपरी चिंचवडला जाणाऱ्या असंख्या बस धावतात. मात्र, या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून अनेक वाहनचालक आपली वाहने बिनधास्त मेट्रो स्टेशनखाली लावून जातात. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतूक रहदारी मंदावते.
सकाळ व संध्याकाळी घाईच्या वेळीस कोंडी होत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे नक्की मेट्रो वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे की कोंडीत भर टाकण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या असंख्य बसथांब्यावरून रोज हजारो नोकरदारवर्ग, शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक, महिला लहान मुले या बसथांब्यावरून प्रवास करत असतात. त्यामुळे या स्वयंघोषित वाहनतळामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.