Naseeruddin Shah And Paresh Rawal Pudhari
पुणे

Pune Theatre Festival: पुण्यात श्रीराम लागू नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन; नसीरुद्दीन शाह आणि परेश रावल यांची रंगली खास मुलाखत

अभिनय, नाट्यकला आणि अनुभवांवर मनमोकळ्या गप्पा; “आयुष्य हाच सर्वात मोठा शिक्षक” – नसीरुद्दीन शाह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ”मला तर प्रत्येक भूमिका कठीण वाटते. जेव्हा मी त्यावर काम करायला सुरुवात करतो आणि हळूहळू ती सोपी होत जाते. कारण मला त्यात खूप आनंद मिळतो. मी संहितेवर खूप काम करतो आणि मी सादरीकरण किंवा सादरीकरणाच्या मांडणीबद्दल घाईघाईत कोणताही निर्णय घेत नाही,” असे मत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सोमवारी (दि. 25) व्यक्त केले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीयांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी झाले. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन अभिनय समाट नसीरुद्दीन शाह आणि परेश रावल यांची मुलाखत रंगली. या दोन मित्रांनी एकमेकांच्या अभिनयाची ताकद, कारकिर्दीची सुरुवात आणि प्रायोगिक नाटकांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सेंटरचे अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, डॉ. आनंद लागू, महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे उपस्थित होते.

चित्रपटांची दुनिया माझ्यासाठी जादुई होती आणि तेव्हापासूनच मी स्वप्न पाहायला सुरुवात केली की, मला अभिनय क्षेत्रातच काम करायचे आहे. मी पहिल्यांदा जेव्हा रंगमंचावर सादरीकरण केले तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. जेफी केंडल हे माझे आदर्श होते. मला खऱ्या अभिनयाची जाणीव आणि समज एफटीआयआयमध्ये आल्यावर आली आणि मला दिशा मिळाली, असे शाह यांनी सांगितले.

“मी रूढ अर्थाने अभिनय शिकलो नाही. कॉलेजमध्ये नाटकात काम करीत असताना हे क्षेत्र निवडले. नसीरभाई आणि ओम पुरी यांना आम्ही पाहायचो तेव्हा, हे अभिनय कसा करतात, या विचाराने थक्क होत असे. गुजराती नाटकांमुळे कामाला सुरुवात झाली. मात्र, मराठी नाटकामुळे पवित्र कला अनुभवता आली. नसीरभाईंमुळे नाटक ही कला समजली. त्यांच्यासोबत केलेले काम गंगेतील स्नानासारखे पवित्र आहे,” र्ींअसे परेश रावल यांनी म्हटले. राजेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनयाचे प्रशिक्षण घ्यायलाच हवे असे वाटत नाही

नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला वाटत नाही की, प्रत्येक अभिनेत्याने अभिनयाचे प्रशिक्षण घ्यायलाच हवे. डॉ. श्रीराम लागू, अमोल पालेकर, परेश रावल यांनीही अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. ते आयुष्यातून आणि इतरांचे काम पाहून शिकले. आयुष्य हाच सर्वात मोठा शिक्षक आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT