धायरी: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हेतील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नऱ्हे ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा धिक्कार असो, महामार्ग रस्त्यावर त्वरित उपाययोजना करा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, बळी वाचवा; बळी वाचवा, निष्पाप लोकांचे अपघातात जाणारे बळी वाचवा, आदी घोषणा देत शेकडो नऱ्हे ग्रामस्थ व नागरिक रस्त्यावर उतरले.
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सेल्फी पॉईंट परिसरातून सह्याद्री हॉटेलपर्यंत सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी याचा निषेध म्हणून मूक मोर्चा काढला.
दरम्यान, येथील राष्ट्रीय महामार्गालगत मानाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात प्रचंड घोषणा बाजी करत आंदोलन केले. या वेळी परिसरात रस्त्यावर चोवीस तास उभा असलेला यम व अपघातात झालेले जखमी यांची बनवलेली मानवी प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
या वेळी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील गवळी, सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.