धायरी: सिंहगड रोड परिसरातील नऱ्हेमध्ये नऱ्हे- धायरी फाटा रस्त्यावर (प्रभाग क्र. 34) मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र व नवले हॉस्पिटल गेट परिसरात सतत रस्त्यावर वाहणाऱ्या मैलापाण्यामुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या या मैलापाण्यामुळे येथून जाता-येताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. येथे दवाखाने, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संस्था असल्यामुळे सतत या रस्त्यावर नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
येथून वाहने जाताना हे मैलापाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. अनेक लहान मुले या रस्त्यावर खेळत असतात. दुर्गंधी व मैलापाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप इत्यादी साथीच्या आजारांची लागण होत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर येणारे मैलापाणी त्वरित बंद करा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
वाहिन्या न जोडल्याने मैलापाणी रस्त्यावर
या परिसरात महापालिकेच्या वतीने मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वाहिनी टाकण्यात आल्या आहेत. परंतु, डोंगर उतारावर असणाऱ्या सोसायट्यांच्या अंतर्गत कमी व्यासाच्या मैलापाणी वाहिन्या या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना जोडल्या नसल्याने ड्रेनेज तुंबून हे मैलापाणी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.अनेक आंदोलने केल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मैलापाण्याच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी, म्हणून महापालिका मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वहिनी टाकण्यात आल्या आहेत. या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या वाहिन्या त्वरित जोडण्यात येऊन या मैलापाण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यात यावी. अन्यथा, तीव आंदोलन करण्यात येईल.
या परिसरातील डोंगर-उतारावर असणाऱ्या सोसायट्यांचा सर्व्हे करून त्यांना नोटिसा देऊन या सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या मैलापाणी वाहिन्या मुख्य मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना जोडण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात येईल.विजय वाघमोडे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
अनेक आंदोलने केल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मैलापाण्याच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी, म्हणून महापालिका मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वहिनी टाकण्यात आल्या आहेत. या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या वाहिन्या त्वरित जोडण्यात येऊन या मैलापाण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यात यावी. अन्यथा, तीव आंदोलन करण्यात येईल.भूपेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ता, नऱ्हे